remdesivir

रेमडेसिवरसाठी कोविड सेंटरखाली रांगा लावून बीडच्या जिल्हाधिकार्‍यांना कोरोना वाढवायचाय

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

बीड दि. 23 : संपर्क कमी करा, सोशल डिस्टंन्स ठेवा, मास्क वापरा असे कितीही सांगितले तरी लोकांना विविध कारणांमुळे हे नियम पाळणे होत नाही. त्यात जिल्हाधिकारी प्रत्येक गोष्टीत रांगा लावण्याचे आदेश काढत असतील तर कोरोना कसा कमी होणार? बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर मिळविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी आगोदर कागदं सबमीट करून रजिस्ट्रेशन करण्याची पध्दत अवलंबिली आहे. हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी चक्क कोरोना पॉझिटिव्ह आलेले लोक ज्या इमारतीत ठेवले त्या इमारतीच्या खाली या रांगा लावलेल्या आहेत. दुसरीकडे सरकारी मालकीच्या खंडीभर इमारती बीड शहरात रिकाम्या असताना इथे रांगा कशासाठी लावल्या असतील हे जिल्हाधिकार्‍यांनाच ठाऊक. एक मात्र खरे की त्यांना या कृतीतून कोरोना कमी करायचा नसून तो अधिक वाढला पाहीजे असे दिसून येते.

रजिस्ट्रेशनसाठी इथे रांगा लावलेला प्रत्येक व्यक्ती कोरोना रुग्णाच्या जवळून संपर्कात आलेला आहे. तो दररोज त्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटतो. या रांगेत कुठलही सोशल डिस्टंन्स पाळलं जात नाही. किंबहुना ते इथं पाळणंही शक्य नाही. कारण लोक आधीच उन्हा तान्हात थकून-भागून इथे रांगेला लागलेली आहेत. एका व्यक्तीला किमान दोन ते तीन तास इथे रांगेत उभे रहावे लागते. त्याला उन लागतंय. जवळपास कुठेही काही खायला प्यायला नाही. बसस्टॅन्डपासून हे आयटीआय तब्बल दिड ते दोन किलोमीटर. ज्याच्याकडे दुचाकी तो पोहोचतो. पण ज्यांच्याकडे यापैकी काहीच नाही त्यांना शहरात ना रिक्षा भेटते ना कोणी लिफ्ट देते. पायी चालताना वाटेत पोलीसांना वाटलंच तर चेकींग होते. पण पोलीसांनी सध्या तरी सामंज्यस्य दाखवून कुणावरही अद्याप काटी उगारलेली नाही. हा एकमेव दिलासा रुग्णांच्या नातेवाईकांना आहे.

दोन दिवस रजिस्ट्रेशन करूनही एकदाच इंजेक्शन
घरचा नातेवाईक अ‍ॅडमीट, त्याला तीन वेळ जेवणाचे डबे पोहोच करा, परत रजिस्ट्रेशन करायला रांगेत लागा. परत इंजेक्शन मिळवायला मेडिकलवाल्यांकडे धावाधाव करा. दिवसभर जेवला की नाही याचीही काही माहिती नाही. सततची धावपळ त्यातून न जेवल्यामुळे आलेला अशक्तपणा यातून नातेवाईक आजारी पडतात किंवा मग कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. इतकं सगळं करूनही आणि सतत दोन दिवस दोन इंजेक्शनसाठी वेगवेगळ्या तारखेत रजिस्ट्रेशन करूनही शेवटी त्याचं नाव कुठल्यातरी एकाच दिवसाच्या यादीत येते. जर प्रशासनाला दोन दिवसातून एकदाच इंजेक्शन द्यायचे असेल तर नातेवाईकांना तसे सांगा. त्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी दोनदा दोनदा रांगेत कशाला लावता? त्यांचा वेळ आणि पैसा खर्च करू नका, एवढीच जिल्हाधिकार्‍यांना विनंती आहे.

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीही या गर्दीत
एक कोरोना पॉझिटिव्ह बेअक्कल स्वतःला शिक्षक म्हणवून घेणारा देखील या रांगेकडे विनाकारण आलेला होता. इथे येऊन मस्तपैकी पुढ्या खात तो गप्पा मारत होता. आणि पुन्हा वरतून सांगत होता मी होम क्वारंटाईन आहे, हे काय माझ्या हातावर शिक्का मारलाय. पण उद्या मला रेमडेसिवीर लागलं तर काय प्रक्रीया आहे हे बघण्यासाठी आलोय, असे सांगत होता. ‘कार्यारंभ’ प्रतिनिधीने जेव्हा त्याला तिथून जाण्यास सांगितले त्यावेळीच तो तेथून निघून गेला. असे लोक जर इतक्या गर्दीच्या ठिकाणी वावरत असतील तर कोरोना वाढणार आहे की कमी होणार? याचं उत्तर प्रशासनाने शोधावं.

आणखी खिडक्या वाढवा
रजिस्ट्रेशन करून घेण्यासाठी सध्या तिथे दोनच व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येकाच्या फॉर्मवरील माहिती लिहून घेता घेता सहाजिकच त्यांच्याही कामाची गती मंदावली आहे. या ठिकाणी माजलगाव, धारूर वडवणी या तालुक्यात उपचार घेणार्‍या रुग्णांसाठी एक, परळी, अंबाजोगाई, केज या तालुक्यात उपचार घेणार्‍या रुग्णांसाठी एक, आष्टी, पाटोदा, शिरूर या तालुक्यात उपचार घेणार्‍यांसाठी एक आणि गेवराई, बीड तालुक्यात उपचार घेणार्‍या रुग्णांसाठी एक अशा स्वतंत्र खिडक्या तयार करून कर्मचार्‍यांची नियुक्ती केली तर येथील गर्दी कमी होऊन सोशल डिस्टंन्स देखील पाळला जाईल. पण हे सगळं करण्याऐवजी त्या त्या तालुक्याच्या मेडिकल ऑफिसरने आपल्या तालुक्याची मागणी व रजिस्ट्रेशन आपआपल्या स्तरावर करून घ्यायला हवे. यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असणार आहे.

येथून काऊंटर हलवा
शासकीय आयटीआय येथे लागलेल्या रेमडेसिवीरच्या रांगेमुळे जिल्हाभर कोरोना पसरू शकतो. त्यामुळे येथील जागा हलवून ती सर्वांच्या सोईची होईल, अशा बीड पंचायत समितीमध्ये किंवा सध्याच्या बीड जिल्हा परिषद किंवा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत मागच्या बाजुने किंवा जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीत हलवावी. जेणेकरून रुग्णांच्या रांगा लागल्या तरी ते उन्हाने आजारी पडणार नाहीत. अर्थात एसीत बसून सगळे निर्णय घेणार्‍या जिल्हाधिकार्‍यांना ही कल्पना पचनी पडणार नाही. यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्वाची ठरणार आहे.

आष्टीसाठी धसांनी तालुका वैद्यकीय
अधिकार्‍यांमार्फत वाटले इंजेक्शन

आष्टीतील रुग्णांच्या नातेवाईकांना रांगेत न लागण्याच्या सुचना आ.सुरेश धस यांनी दिल्या आहेत. खासगी हॉस्पिटलने तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांकडे मागणी नोंदवावी, या अधिकार्‍याने आपली मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करावी. त्यानंतर आष्टीसाठी इंजेक्शन कसे येत नाही ते बघतो. रात्री मी आष्टीसाठी 80 इंजेक्शन आणले आणि मेडिकल ऑफिसरमार्फत त्या त्या हॉस्पिटलकडे देऊनही टाकले, अशी माहिती आ.सुरेश धस यांनी कार्यारंभशी बोलताना दिली. आमचा तालुक्यातील कोणीही रांगेत लागू नये, असे अवाहनही धसांनी केले आहे. आज 100 इंजेक्शन आष्टीसाठी पाठवू असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितल्याचे आ.धस म्हणाले.


Tagged