बीड जिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर लॅब मंजूर

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

आता बीडमध्येच प्राप्त होणार कोरोना चाचणीचे रिपोर्ट

बीड : जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, बीडचे आ. संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून, जिल्ह्याच्या कोविड आढावा बैठकीत शब्द दिल्याप्रमाणे जिल्हा रुग्णालयात कोविड-19 विषाणू चाचणीसाठीची व्ही.आर.डी.एल. लॅब मंजूर करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय उशिरा जारी केला आहे.

   या निर्णयांतर्गत बीड जिल्हा रुग्णालयात आर.टी.पी.सी.आर. चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळा उभारणे, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ भरती करणे आदी बाबींना या निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. या प्रयोग शाळेसाठी आवश्यक यंत्र सामग्री, उपकरणे आदींच्या खरेदीसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी तसेच आवश्यकतेनुसार जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. दरम्यान अत्यंत कमी कालावधीत कागदोपत्री प्रक्रियेला आणि प्रोटोकॉल ला बाजूला ठेवत सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहकार्याने ही लॅब मंजूर केल्याबद्दल आरोग्य मंत्री ना. राजेश भैय्या टोपे तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे मुंडे यांनी आभार मानले आहेत. बीड जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे, परंतु अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात एकमेव कोरोना विषाणू चाचणी प्रयोग शाळा उपलब्ध असल्याने कोरोना चाचणीचे अहवाल मिळायला वेळ लागत होता; याच पार्श्वभूमीवर बीड जिल्हा रुग्णालयात नवीन प्रयोगशाळेची मागणी करण्यात आली होती. जिल्हाधिकारी व आरोग्य यंत्रणेने याबाबतची आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून ही प्रयोगशाळा तातडीने कार्यान्वित करावी अशा सूचना मुंडे यांनी दिल्या आहेत.

Tagged