अबबऽऽऽ जिल्हा रुग्णालयात स्कोअर तीन अन् खासगी लॅबचा दहा
केशव कदम/ बीड
- माणसं मारायचा अन् लुटायचा धंदा टाकलाय का?
- वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर आणि ‘कार्यारंभ’ने केला भांडाफोड
- जिल्हाधिकार्यांकडून चौकशीचे आदेश
दि.30 : अॅन्टीजेन आणि आरटीपीसीआरचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी लोक सर्रास सिटीस्कॅन करून आपला एचआरसीटी चा स्कोर तपासून आपल्याला कोरोना झाला आहे किंवा नाही याची खात्री करीत आहेत. पण हीच खात्री आजपर्यंत अनेकांच्या अंगलट आलेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर आणि दैनिक कार्यारंभने संयुक्तपणे शुक्रवार (दि.30) रोजी एक स्टिंग करून बीडमधील सिटी स्कॅनचा भांडाफोड केला आहे. संपूर्ण प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याकडे केली असून त्यांनी देखील गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
एका 27 वर्षीय महिलेचा पती कोरोना पॉझिटिव्ह आले होते. पत्नीलाही थोडासा ताप आल्याने आम्ही त्यांना 30 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात अॅन्टीजेन टेस्टला आणले. त्यावेळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आम्ही त्यांचं जिल्हा रुग्णालयात एचआरसीटी स्कॅन करण्याचा निर्णय घेतला. तिथे दुपारी बाराच्या सुमारास त्यांचा रिपोर्ट हाती आला. त्यात एचआरसीटी स्कोअर 3 दाखवण्यात आला. आम्ही जिल्हा रुग्णालयावर अविश्वास दाखवत संतोषी माता टॉकीजच्या बाजुस असलेल्या शिवाजीराव हॉस्पिटल येथे जाऊन संबंधीत महिलेचा दुपारी तीनच्या सुमारास छातीचा एक्स रे काढला. त्यात रिपोर्ट नॉर्मल दाखवण्यात आला. आम्ही याही रिपोर्टवर अविश्वास दाखवून त्यांच्याच युनिक अॅडव्हॉन्स्ड् सिटी इमेज इथेच एचआरसीटी स्कॅन करण्याचा निर्णय घेतला. दुपारी पाचच्या सुमारास आम्हाला याचा रिपोर्ट मिळाला. तेव्हा त्यात चक्क 10 चा स्कोर दाखवण्यात आला.
जिल्हाधिकार्यांनी घेतली गंभीर दखल
दरम्यान हे दोन्ही रिपोर्ट घेऊन आम्ही जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याकडे गेलो. त्यावेळी त्यांनाच हे दोन्ही रिपोर्ट दाखवून नेमका कोणता रिपोर्ट चूक आणि कोणता रिपोर्ट बरोबर हे आम्हाला सांगण्यात यावं, अशी विनंती त्यांना केली. त्यावेळी जिल्हाधिकारीही बचुकळ्यात पडले. त्यांनी लागलीच या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत.
आर्थिक लूट आणि रुग्णांना जिवानिशी मारण्याचा प्रकार
जेव्हा आम्ही जिल्हा रुग्णालयात महिलेचा एचआरसीटी तपासला तेव्हा तो 3 दाखवण्यात आला. तर शिवाजीराव या खासगी लॅबमध्येे छातीचा एक्सरे निल दाखवण्यात आला. तर त्यांच्याच युनिक अॅडव्हॉन्स्ड् सिटी इमेज येथे एचआरसीटी स्कोर हा चक्क दहा दाखवण्यात आला. जर जिल्हा रुग्णालयाचा रिपोर्ट चुकीचा असेल तर आतापर्यंत त्यांनी अनेकांना असेच चुकीचे रिपोर्ट देऊन जिवानिशी मारल्या प्रकरणी त्यांना जबाबदार धरायला हवे. आणि जर खासगी सिटीस्कॅनच्या रेडिओडायग्नोसीस यांचा रिपोर्ट बरोबर असेल तर त्यांच्याकडेच काढलेला छातीचा एक्स रे निल कसा आला? सरकारी रुग्णालय किंवा खासगी रुग्णालय या दोघांमध्ये कोणीतरी चुकीचं आहे हे सिध्द होईलच.
तज्ज्ञ काय सांगतात?
या क्षेत्रात काम करणार्या विविध तज्ज्ञांशी ‘कार्यारंभ’ने जेव्हा चर्चा केली त्यावेळी त्यांनी सांगितले की जिल्हा रुग्णालयात आणि खासगी सिटीस्कॅनच्या रिपोर्टमध्ये 7 स्कोरचा फरक पडू शकत नाही. फार फार तर दोन स्कोरचा फरक आम्ही ग्राह्य धरतो. यात दोन्हीपैकी कुठल्यातरी एका मशिनचा रिपोर्ट चुकीचा येत आहे. आणि खासगी लॅब एचआरसीटी स्कोर 10 दाखवित असेल तर छातीच्या एक्सरेमध्ये संसर्ग आढळून यायला हवा होता. स्कोअर जर 3 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर एक्सरेमध्ये काही दिसत नाही तो निल येतो. पण इथे दहाचा स्कोर आलेला असल्याने छातीचा एक्स रे निल यायला नको होता, असेही तज्ज्ञ म्हणाले.
दोन मशिनमधील रिपोर्टमध्ये कमी जास्त दोन अंकाचा फरक ग्राह्य आहे. परंतु इतका मोठा फरक अपेक्षीत नाही.
डॉ.संतोष जैन, ‘क्ष’ किरण तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय बीड
जिल्हा रुग्णालय किंवा युनिकने नुकसान भरपाई द्यावी -प्रा.बांगर
चुकीचे स्कोर रिपोर्ट दाखवून रुग्णांच्या जिवाशी खेळले जात आहे. हॉस्पिटलचे डॉक्टर आणि खासगी सिटीस्कॅन सेंटरकडून रुग्नांची आर्थिक लूट केली जात आहे. जिल्हा रुग्णालयाची मशिन चुकीची असेल तर आजपर्यंत इथे कित्येकजणांचे जीव गेले आहेत. त्याला जिल्हा रुग्णालय जबाबदार असेल. आणि जर युनिकचे रिपोर्ट चुकीचे असतील तर आजपर्यंत इथून ज्यांनी ज्यांनी एचआरसीटी स्कॅन करून हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेतले त्या सगळ्यांची आर्थिक लूट झाली आहे. त्या सर्व रुग्णांच्या आर्थिक नुकसानीची युनिकने भरपाई करावी, सिटी स्कॅनचालक, मेडीकल चालक आणि डॉक्टर यांची खूप मोठी साखळी कार्यरत आहे असा आम्हाला संशय किंवा मग जिल्हा रुग्णालय गोरगरीबांच्या आरोग्याशी खेळत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजनचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर यांनी केली आहे.
एचआरसिटीचे खालील काही रिपोर्ट पहा…
जिल्हा रुग्णालयातून देण्यात आलेला हाच तो सिटी स्कॅन रिपोर्ट ज्यात स्कोर केवळ 3 दाखविण्यात आला होता.
शिवाजीराव बडे यांच्याकडे छातीचा एक्सरे काढला. त्यातही रिपोर्ट निल दाखवण्यात आला.
युनिक सिटीस्कॅन सेंटरमध्ये सीटीस्कॅन स्कोर चक्क 10 दाखविण्यात आला.
कार्यारंभचे आवाहन
जिल्हाभरातील वाचकांना आम्ही आवाहन करीत आहोत की आपण जर आपल्या नातेवाईकांचा एचआरसिटी स्कॅन करणार असाल तर तो दोन वेगवेगळ्या खासगी सेंटरमध्ये करून बघा. किंवा एक सरकारी आणि दुसरा खासगीत एकाच दिवशी करून पहा. दोन्हीमध्ये जर दोन पेक्षा अधिक अंकाची तफावत आढळून आली तर आम्हाला 9404350898 या क्रमांकावर त्वरीत संपर्क करा. जिल्हाभरात जर असे होत असेल तर ही लूट सुरु आहे हे निश्चित…