DEATH BODY

बीडच्या आरोग्य विभागाने १०५ कोरोनाबळींचा आकडा लपविला

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

धक्कादायक : ३७८ अंत्यसंस्कार, नोंद केवळ २७३

बीड : जिल्ह्यातील कोरोनाबळींचे प्रमाण झपाट्याने वाढले असून मृत्युसंख्येने ‘हजारी’ पार केली आहे. अशातच बीडच्या आरोग्य विभागाने एप्रिल महिन्यातील १०५ कोरोनाबळींचा आकडा लपविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बीड व अंबाजोगाईत केवळ एप्रिल महिन्यात तब्बल ३७८ बाधितांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. तर आरोग्य विभागात याच महिन्यात २७३ मृत्यूची नोंद आहे. यावरून १०५ कोरोनाबळींचा आकडा दडविल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केल्याचा आव प्रशासन आणत आहे. तर दुसऱ्या बाजूला रोज उपचारातील दुर्लक्ष आणि अपुऱ्या सुविधांमुळे स्मशानात मृतदेहांच्या रांगा लागत आहेत. या सर्व मृत्यूची नोंद तत्काळ आयसीएमआरच्या पोर्टलवर होणे अपेक्षित असते आणि ती करत असल्याचे आरोग्य विभाग सांगतोय. परंतू यात खोलवर जावून माहिती घेतली असता आकडे दडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, आकड्यांची तफावतीबद्दल संबंधित अंत्यसंस्कार करणाऱ्या नगरपालिका/नगरपरिषदा व आरोग्य विभागाच्या संस्थांनी माहिती घेऊन कळवू असेच स्पष्टीकरण दिले आहे.

Tagged