अतिवृष्टीमुळे नुकसान; पालकमंत्री धनंजय मुंडे उद्या करणार पाहणी

न्यूज ऑफ द डे बीड

पंचनाम्यांच्या कार्यवाहीला मिळेल गती

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे हे उद्या (दि.2) आष्टी, गेवराई, बीडसह वडवणी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार असल्याची माहिती संपर्क विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, त्यांनी पंचनामे करून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना यापूर्वीच जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. परंतू, पंचनाम्यांच्या कार्यवाहीला अद्याप अपेक्षित अशी गती मिळू शकलेली नाही.

मुंडे यांच्या संपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ते अहमदनगर येथे शासकीय निवासस्थानी मुक्कामी आहेत. तेथून ते बीड जिल्ह्यात सर्वप्रथम आष्टी तालुक्यातील मराठवाडी येथे सकाळी 9 वाजता दाखल होत आहेत. त्यानंतर ते देऊळगाव घाट, शेडाळा, सावरगाव परिसरातील पिकांची पाहणी 11 वाजेपर्यंत करणार आहेत. त्यानंतर 1 वाजता गेवराईत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर तालुक्यातील गंगावाडी तहत तलवाडा, रामनगर, राजुरी मळा परिसरातील शेतीची पाहणी सव्वा तीन वाजेपर्यंत करणार आहेत. त्यानंतर बीड तालुक्यातील पोखरी व घाटसावळी येथे 4 वाजेपर्यंत नुकसानीची पाहणी करतील. त्यानंतर ते सोयीनुसार वडवणी तालुक्यातील चिंचवण येथे पाहणी करून परळीकडे प्रस्थान करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या दौर्‍यानंतर पंचनाम्यांच्या कार्यवाहीला गती मिळेल अशी शेतकरी वर्गाला अपेक्षा आहे.

Tagged