माणुसकी संपली! सरकारी जागेतील कोविड सेंटरला नेकनूरकरांचा विरोध

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

विघ्नसंतोषी लोकांमुळे नेक गावाचा नूर बदलला
अशोक शिंदे । नेकनूर
दि.9 : सध्या देशासह जगभरामध्ये कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत आहे. शासकिय यंत्रणा कमी पडत असल्यामुळे अनेक संस्था, संघटना पुढे येऊन कोरोना बाधितांच्या मदतीतून माणुसकीचे दर्शन घडवत आहेत. तर दुसरीकडे मात्र माणुसकी गोठल्याचे उदाहरण पहायला मिळत आहे. बीड तालुक्यातील नेकनूर येथे शासकिय कोरोना सेंटरसाठी मान्यता मिळाली. यामुळे परिसरातील रुग्णांना याचा लाभ होईल, बीडपर्यंत येण्याची गरज पडणार नाही असे वाटत होते. परंतु येथील स्थानिक काही विघ्नसंतोषी याला विरोध करत आहेत. त्यामुळे अशा वृत्तींचा संताप व्यक्त केला जात आहे.
बीड तालुक्यातील नेकनूर येथील जिल्हा परिषद शाळेत कोविड सुरू करण्यास मान्यता मिळाली. मात्र स्थानिक नागरिकांनी या कोविड सेंटरला विरोध केला आहे. कोविड सेंटरला विरोध होण्याची महाराष्ट्रातील पहिलीच घटना असावी. गावातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत मूलभूत सुविधा असल्याने येथे सरपंच व गावातील काही युवक यांनी एकत्रित येत कोविड सेंटर मंजूर करून आणले. कामास सुरुवातही केली. विशेष म्हणजे ही जागा जिल्हा परिषदेची आहे. सेंटरला मंजुरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेली आहे. ही इमारत बसस्थानकाजवळ आहे. आठ एककरमध्ये प्रशस्त अशी जागा आहे. सर्व बाजूंनी वस्तीच्या 150 मिटर अंतरावर आहे. येथे खूप छान सोय होऊ शकते. या उद्देशाने येथे सेंटर सुरू करण्याचे प्रयत्न करत आहेत. स्थानिक थेटे कॉलनी व शहाबाज कॉलनी येथील लोकांनी विरोध केला आहे. 100 पेक्षा जास्त लोकांनी येऊन ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन दिलेले आहे. निवेदनात त्यांनी उल्लेख केला आहे की, हे वर्दळीच्या ठिकाण आहे. तसेच या लोकांनी धमकीही दिली आहे की, जर तुम्ही एकले नाही तर आमच्या महिला मुलं ग्रामपंचायत येथे आणून बसवू. आम्हाला मारू द्या, काय व्हायचे ते होवू द्या पण हे सेंटर नको. एवढे तीव्र पद्धतीने विरोध केला जात आहे.

अवैध धंद्यासाठी हवी आहे जागा
कोविड सेंटरला विरोध करण्यात राजकारण घुसलेले आहे. तसेच शाळा बंद असल्यामुळे काही नागरिक येथे जुगार खेळतात, मटका घेतात, सुरट खेळतात, लूडो गेम खेळतात, दारू पितात यांची गैरसोय होईल. म्हणून कोविड सेंटरसाठी विरोध केला जात असल्याची माहिती आहे.

सेंटरसाठी शासनाकडून फक्त औषध व कर्मचारी
या कोविड सेंटरला शासन फक्त औषध आणि कर्मचारी देणार आहेत. इतर सुविधा म्हणजे जेवण, स्वच्छता, पाणी, बेड हा सर्व खर्च कोविड केअर सेंटर समिती करणार आहे. समितीने 95 हजार रुपये खर्च केलेले आहेत. त्यामध्ये सरपंच यांनी 50 हजार रुपये खर्च केलेला आहे.

ग्रामपंचायतने पुढाकार घ्यावा
नेकनूर येथील सुरू होत असलेल्या कोविड सेंटरला गावातील काही विघ्नसंतोषी नागरिकांनी विरोध करत आहेत. कोविड सेंटर सुरू होऊ न देण्याची भूमिका घेतल्यामुळे मोठी अडचण निर्माण होत आहे. यासाठी ग्रामपंचायत यांनी संबंधित कॉलनी मधील नागरिकांना विश्वासात घेऊन हे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
———–

Tagged