court

नरेगा घोटाळा :मुख्य सूत्रधार दिनकर लव्हारेचा अटकपूर्व जामीन फेटाळला

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

अभियंत्यासह पोस्टमनला दिलासा
प्रतिनिधी । अंबाजोगाई
दि.22 ः अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव ते फावडेवाडी या नरेगा अंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात 17 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी 16 सप्टेंबर 2021 रोजी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि सहशिक्षक असलेल्या दिनकर वसंतराव लव्हारे याचा अटकपूर्व जामीन औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी फेटाळला आहे. तर याच प्रकरणात दोषी अभियंत्यासह पोस्टमनला अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने दिलासा मिळाला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव ते फावडेवाडी या रस्त्याचे काम सन 2014 2015 दरम्यान मंजूर करण्यात आले होते. या कामात अपहार झाल्याची तक्रार प्रभावती भीमराव कांबळे, नारायण लव्हारे, सत्यपाल रामभाऊ वाघमारे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे दिली होती. प्रशासनाच्या समितीमार्फत चौकशी करण्यात आली. दरम्यान, पट्टीवडगाव ते फावडेवाडी या रस्त्याच्या कामास रोजगार हमी योजनेअंतर्गत अंबाजोगाईचे तहसीलदार व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी मंजुरी दिली होती. हे रस्त्याचे काम नागेश्वर विद्यालय (लाडझरी ता.परळी) येथे सहशिक्षक असलेल्या दिनकर लव्हारे याने गुत्तेदार असल्याचे भासवून स्वतः केले. मुळात या कामाचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाचे उप अभियंता मिलींद सत्यनारायण चव्हाण यांनी चुकीचे बनविले होते. आणि पुढे दिनकर लव्हारे याच्याशी संगनमत करून चुकीची बिले सादर केली तर त्याला खातेधारकांच्या परस्पर पैसे उचलून देण्यास पोस्टमन पंडित ज्ञानोबा पोपळे यांनी मदत केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे. या प्रकरणात अंबाजोगाईचे नायब तहसीलदार दत्तात्रय सरोदे यांच्या फिर्यादीवरून 16 सप्टेंबर 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी अंबाजोगाई येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता, परंतु न्यायालयाने अर्ज फेटाळला. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. सुनावणीअंती औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रकाश नाईक यांनी मजुरांच्या नावावरील पैसे उचलून अपहार करण्यात अभियंत्यांसह पोस्टमनचा प्रत्यक्ष सहभाग दिसून न आल्याने अटकपूर्व जामीन मंजूर केला. तर मजुरांच्या नावावरील पैसे उचलणार्‍या मुख्य सूत्रधार दिनकर लव्हारे याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. अटकपूर्व जामीन अर्जाविरोधात शासनाच्यावतीने अ‍ॅड. डी. आर. काळे व मुळ तक्रारदार यांच्या वतीने अ‍ॅड.सचिन बी.मुंडे यांनी बाजू मांडली. दरम्यान, पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, त्याच्या अटकेच्या हालचाली सुरू असून तो फरार असल्याचे समजते.


मृत व्यक्तींना मजूर दाखविले,
परस्पर अनेक खाते उघडले!

अनेक व्यक्तींच्या परस्पर खाते उघडून पैसे उचलण्यात आले. तसेच, रोजगार हमी योजनेंतर्गत रस्त्याच्या कामावर मृत व्यक्तींना मजूर दाखवून पैसे उचलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अशा प्रकारे शिक्षकाने शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. या नरेगा घोटाळ्यातून आरोपीने लाखो रुपयांची संपत्ती जमा केली. त्यामुळे त्यांच्या संपत्तीची देखील चौकशी करण्याची मागणी पट्टीवडगाव, फावडेवाडी परिसरातील नागरिकांतून होत आहे.

Tagged