28 लाखांचा मुद्देमाल जप्त; आठ जणांवर गुन्हा दाखल एकास अटक
नेकनूर दि.22 : गुटखा बंदी असतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा येत असल्याचे वारंवार होणार्या कारवाईतून दिसत आहे. बुधवारी (दि.22) पहाटेच्या सुमारास एक गुटख्याचा ट्रक मांजरसुंबा परिसरात पकडण्यात आला. यावेळी ट्रकमध्ये 21 लाख 45 हजारांचा गुटखा व ट्रक असा 28 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एकास पोलीसांनी ताब्यात घेतले असून सातजण फरार आहेत. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, नेकनूर पोलीस ठाण्याचे सपोनि.मुस्तफा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टिमने केली आहे.
अंबाजोगाई येथून गुटख्याचा एक ट्रक पाटोद्याकडे जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्यांनी याची माहिती त्यांच्या टिमला दिली. टिमने ही माहिती पुढे गस्तीवर असलेल्या नेकनूर पोलीसांना दिली. यावेळी हा ट्रक (केए-56 इ-0510) मांजरसुंबा परिसरात पकडला. यावेळी पोलीसांना पाहून एकजण फरार झाला. पोलीसांनी चालक अमोल भीमराव कणुजे (वय 24 रा.विघणवाडी ता.शिरुर जि.बीड) यास ताब्यात घेतले. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारचा 21 लाख 45 हजार रुपयांचा गुटखा आढळून आला. याबाबत अमोलकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, विरेंद्र उर्फ बबलू भागवत जायभाये (रा.पिंपळनेर ता.शिरुर), सिम्पल पालवे (रा.जळगाव ता.पाथर्डी), सचिन काते, गणेश गायकवाड, पिनू पवार (रा.पाथर्डी जि.अहमदनगर), विठ्ठल कोकाटे, सतिष, (रा.जामखेड जि.अहमदनगर) यांनी मिळून व्हेरणा कार (एमएच-04 1622), एक विनानंबरच्या कारने परराज्यातून गुटखा आणल्याचे सांगितले. इतर साथीदार हे कारने पुढे गेलेले असल्याची माहिती दिली. या प्रकरणी पोह.बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरुन नेकनूर पोलीस ठाण्यात आठ जणांवर कलम 328, 272, 273 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सपोनि.मुस्तफा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली केज उपविभागीय कार्यालयातील पोना.अहंकारे, पोशि.खाडे, वंजारे यांनी केली. तर त्यांना नेकनूर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक गायकवाड, पोना.खांडेकर, पोशि.ढाकणे, शेख इसाक यांनी सहकार्य केले.
शिरुर तालुक्यात जाणार होता गुटखा
सदरील गुटखा हा रात्रीच्या सुमारास परराज्यातून आणला होता. त्यासाठी ट्रकच्यासोबत दोन व्हेरना कारही होत्या. अंबाजोगाईतून या कार शिरुरकडे पुढे गेल्या. ट्रक सकाळपर्यंत शिरुरमध्ये पोहचणार होता. पण त्यापूर्वीच पोलीसांनी ट्रक ताब्यात घेतला.
गुटख्याचा ट्रक चोरुन आणल्याची चर्चा
सदरील गुटख्याचा ट्रक हा आरोपींनी चोरुन आणल्याची चर्चा होती. पंरतू ट्रक चोरी गेल्याची फिर्याद ट्रक मालक पोलीसात देणार नाही. तोपर्यंत ट्रक चोरीचा आहे, असे म्हणता येणार नसल्याची माहिती पोलीसांनी दिली.