आठ मोबाईल केले जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बीड दि.23 : शहरात दररोज दुचाकी चोरी, मोबाईल चोरीच्या घटना सर्रास घडत आहेत. पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी स्थानिक गुन्हे शाखेला चोरीच्या घटनेतील आरोपींचा शोध घेवून जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी (दि.23) सकाळी एका मोबाईल चोरास अटक केली. त्याकडून शहरातच चोरी केलेले आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
ऋतीक राकेश झंझोटे असे आरोपीचे नाव आहे. शहरातील हिरालाल चौक परिसरातून त्यास ताब्यात घेतले. त्याने मागील काही दिवसात शहरातील राष्ट्रवादी भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अंकुश नगर, जालना रोड, तुळजाई चौक, कॅनोल रोड या भागातून मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्याकडून विविध कंपन्यांचे आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सदरील प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल होते. सदर आरोपीस पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. त्याकडून आणखी काही गुन्हे उघकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ व त्यांच्या टिमने केली.