vinayak mete and gopinath munde

ती पहाट अन् आजची पहाट दुर्दैवी

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र राजकारण

बीड, दि.14 : माजी आ.विनायक मेटे यांचा आज अपघाती मृत्यू झाला. पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी हा अपघात झाल्यानंतर सकाळी 7.20 च्या सुमारास त्यांचे निधन झाल्याच्या बातम्या धडकू लागल्या. अशीच घटना 3 जून 2014 रोजी गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर बीड जिल्ह्याच्या वाट्याला आलेली होती. मुंडे हे बीडकडे निघाले असताना दिल्लीत सकाळी सव्वा सहा वाजता त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि साडे सात वाजता त्यांच्या निधनाच्या बातम्या धडकू लागल्या होत्या.

माजी आ.विनायकराव मेटे आणि गोपीनाथराव मुंडे हे राजकारणातील सहकारी होते. मुंडे ज्यावेळी युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या सरकारने विनायक मेटे यांना मराठा चेहरा म्हणून त्यांनी पहिल्यांदा विधान परिषदेवर संधी दिली. तेव्हापासून ते आजपर्यंत ते सातत्याने विधान परिषदेवर जात होते. मधल्या काळात मुंडे यांच्याशी त्यांचे राजकीय मतभेद झाल्यानंतर ते राष्ट्रवादीमध्ये गेले. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन महायुतीला शिवसंग्राम संघटनेचा पाठींबा दिला. मुंडे मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात केंद्रीय ग्रामविकास मंत्री झाले आणि अवघ्या आठच दिवसात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विनायक मेटे यांनाही या मंत्रिमंडळात सामावून घेतले जाणार अशी ग्वाही देवेंद्र फडवीस यांनी दिली होती. या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापुर्वीच विनायक मेटे यांचेही दुर्दैवी अपघाती निधन झाल्याने बीड जिल्ह्याने आणखी एक चळवळीतील मोठा कार्यकर्ता गमावल्याची भावना बीड जिल्हा वासियांमध्ये आहे.
मेटे आणि मुंडे हे दोघेही अत्यंत सामान्य कुटुंबातून राजकारणात पुढे आले होते. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्या रांगेत स्थान पटकावले होते. मात्र आता हे दोन्ही नेते बीड जिल्याने गमावल्याने जिल्ह्याची खूप मोठी हानी झालेली आहे.

Tagged