vinayak mete

पहाटे साडेतीन वाजता अपघात, साडेसहा वाजता हॉस्पिटलमध्ये

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र राजकारण

वेळेवर मदत न मिळाल्यामुळेच विनायक मेटे यांचा दुर्दैवी मृत्यू

बीड, दि.14 : माजी आ.विनायक मेटे हे बीडहून मुंबईकडे मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी रवाना होत होते. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर माडप बोगद्याजवळ त्यांच्या गाडीला पाठीमागून आलेल्या ट्रकने डाव्या बाजुने घासत नेले. यात मागच्या सीटवर बसलेले आ.मेटे रस्त्यावर खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला पाठीमागील बाजुने गंभीर मार लागला. ही घटना सकाळी साडेतीनच्या सुमारास घडली. मात्र अपघात घडून गेल्यानंतर त्यांना तब्बल साडेतीन तासानंतर पनवेल जवळील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु इथे पोहोचण्यापुर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. विनायक मेटे यांच्या निधनामुळे मराठा समाज आणि एकूणच बीड जिल्ह्याचे राजकीय आणि समाजिक खूप मोठे नुकसान झाले आहे.

रुग्णालय प्रशासनाने सांगितले की त्यांना जेव्हा 6.20 वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यावेळी त्यांची हालचाल बंद होती. त्यांचा ईसीजी काढण्यात आला तो पण ब्लँक आला. कदाचित त्यांचा मृत्यू घटनास्थळीच झाला असावा, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी दिली. यात समोरील बाजुने बसलेले त्यांचा बॉडीगार्ड राम ढोबळे देखील गंभीर जखमी झाला आहे. चालक एकनाथ कदम यांना किरकोळ मार लागला असून त्यानेच वेळेवर मदत मिळू शकली नाही, असे माध्यमांना सांगितले. शिवाय मदती साठी मी अनेक गाड्यांना हात केला. अक्षरशः रस्त्यावर झोपलो पण मात्र कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही, असे कदम म्हणाले.

मात्र या घटनेनंतर मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. तो म्हणजे अपघात घडून गेल्यानंतर रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यापर्यंत तब्बल साडेतीन तासाचा कालावधी लागलेला आहे. त्यांना वेळेवर अ‍ॅम्बुलन्स किंवा इतर कुणाचीही मदत का मिळू नये? त्यांना वेळीच मदत मिळाली असती तर हा वेळ वाचला असता, मेटे यांना तत्काळ मदत मिळाली असती तर कदाचित आज मराठा चळवळीचा बुलंद आवाज हरपला नसता, अशा प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. शिवाय हा अपघात आहे की घातपात याची चौकशी करावी, मराठा आरक्षणासाठी अजून किती बळी घेणार आहे सरकार? असा सवाल मेटे समर्थकांनी केला आहे.

या प्रकरणाची चौकशी होईल – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
दरम्यान या प्रकरणाची गभीर दखल सरकारकडून घेण्यात आली आहे, संपूर्ण चौकशी होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कुटुंबियाशी चर्चा करून मेटे यांचा अंत्यविधी कुठे करायचा याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.




Tagged