बालाजी मारगुडे । बीड
दि. 5 : आ.विनायक मेटे यांचा मराठा क्रांती संघर्ष मोर्चा होऊच नये यासाठी राजे-महाराजे, रथी-महारथी, स्थानिकच्या प्रस्थापित मराठा नेत्यांसह राज्याच्या राजकारणातील मराठा मंत्र्यांनी बीडमध्ये इकडून-तिकडे, तिकडून-इकडे टुणूक-टुणूक उड्या मारत फोनफोनी करीत मोर्चा निघूच द्यायचा नाही, यासाठी शक्ती पणाला लावली होती. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि प्रशासनावर मोर्चा न काढण्यासाठी मोठा दबाव असताना आ.मेटे यांनी सर्वात आधी या दोघांना विश्वासात घेतले. त्यानंतर मराठा समाजाचे दुसरे नेते स्व.अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांना बीडमध्ये आणले. नुसते आणलेच नाहीतर त्यांना गावोगावच्या बैठकात देखील सहभागी व्हायला लावले. यातून त्यांनी समाजाचा विश्वास संपादीत केला. समाजाच्या मनात कोरोनाची भिती असतानाही लोकांनी आजच्या मोर्चाला लावलेली हजेरी विरोध करणार्या सगळ्याच प्रस्थापित मराठा पुढार्यांच्या तोंडात सणसणीत चपराक आहे.
आ.मेटे हे एक अजब रसायन आहेत. त्यांना जितका विरोध केला जातो तितके ते पेटून उठतात. आधीच कोरोना, त्यात असलेला लॉकडाऊन, पाय खेचणारे प्रस्थापित पुढारी, पुढार्यांचे बगलबच्चे, पाऊस येतो की काय? आणि इतर सामाजिक दबाव यामुळे मेटेंचा मोर्चा होईल की नाही, अशी शंका सार्यांच्याच मनात होती. लोक मोर्चासाठी जेव्हा घरातून बाहेर पडत होते तेव्हाही प्रस्थापित मराठा पुढार्यांनी कुठल्या गावातून कोणता कार्यकर्ता मोर्चासाठी जातो याचे टिपण आपल्या हस्तकांमार्फत घेतले. एक तर लोकांना जाऊच द्यायचे नाही, निघालेच तर पुढे अॅन्टीजेन टेस्ट करीत आहेत, पोलीस गाड्या अडवत आहेत, पोलीस मारत आहेत, गुन्हे नोंद होत आहेत, हा सरकार विरोधातील मोर्चा आहे, हा भाजपचा मोर्चा आहे, मेटेंची आमदारकी संपत आली म्हणून आता हा मोर्चा आहे, अशा एक ना अनेक प्रकारच्या कांड्या पिकवल्या. मात्र अनेकांनी यातील कसल्याच गोष्टीवर विश्वास न ठेवता बीड गाठून आरक्षण मोर्चात हजेरी लावली.
आ.मेटे पहिल्यापासून संघर्षाशी दोन हात करणारे नेते म्हणून ओळखले जातात. खेळपट्टी साथ देत नाही. शेवटच्या बॉलवर 12 रन हव्यात, मॅच हरणार हे जवळपास निश्चित, प्रेक्षक स्टेडिअममधून बाहेर पडायला लागतात. पण तेव्हाही मेटेंच्या चेहर्यावर दडपण नसते. आपण सामना काढूच हा त्यांचा प्रयत्न असतो. दैवही त्यांना नेहमीच साथ देते. नेमका शेवटचा बॉल ‘नो’ पडतो आणि मेटे त्यावर षटकार मारतात, रनरेट वाढतो आणि आता एक बॉल सहा रन असे समिकरण तयार होते. तेव्हाही मेटे उत्तुंग षटकार ठोकतात. काय झाले, कसे झाले हे समजण्यापुर्वी आ.मेटेंनी सामन्याचा निकाल आपल्या बाजुने लावलेला असतो. हे एकदा नाही मेटेंनी अनेकदा दाखवून दिलेले आहे.
या मोर्चाच्या वेळी देखील कुठलीच परिस्थिती अनुकूल नसताना मेटेंनी रात्रंदिवस झपाटल्यागत काम केले. दिवसभरात विविध अधिकार्यांशी बोलून त्यांचाशी समन्वय ठेवला. गावोगावच्या मराठा कार्यकर्त्यांशी फोनवरून चर्चा केली. तालुका आणि ग्रामस्तरावर बैठका घेऊन प्रस्थापित मराठा नेत्यांनी पिकवलेल्या कांड्या कशा चुकीच्या आहेत, तुम्ही मोर्चात येणं का गरजेचं आहे हे पटवून दिले. मागील 30 वर्षाच्या राजकारणात मी मराठ्यांसाठी काय काय केले याचा लेखाजोखा सर्वांसमोर ठेवला. गरीब घरातलं सामान्य मराठ्याचं पोरगं आमदार असू नये असं प्रस्थापित मराठा पुढार्यांना वाटतं, त्यामुळे ते सातत्याने माझ्या भुमिकेला विरोध करतात. बाहेर जातीतल्या लोकांचा विरोध समजू शकतो पण मराठ्यांचा विरोध हा न समजण्या पलिकडचा असतो. राजकारण म्हणून जरूर विरोध करा, परंतु गरीब मराठ्यांसाठी हवं असलेल्या आरक्षणाला कसला विरोध करता? हा त्यांचा सवाल बैठकीतील कार्यकर्त्यांना अंतर्मुंख करून गेला. काल, आज आणि उद्याही छातीठोकपणे सांगतो हा मेटे जो कोणी आहे तो केवळ मराठा समाजामुळे आहे. इतर नेत्यांनी मी मराठा समाजाचा आहे हे छातीठोकपणे सांगून दाखवावे, असे जाहीर आव्हान ते गावोगावच्या बैठकीत प्रस्थापित मराठा पुढार्यांना देत होते. मराठा आरक्षण प्रश्नावर ते लढत असलेला कायदेशीर लढा मराठा युवकांना समजावून सांगत होते. सरकार नेमकं कुठे चुकले, केंद्राची जबाबदारी काय? आरक्षण उपसमितीने कसा हलगर्जीपणा केला हे ते कळकळीने सांगत होते. त्यांची ही सगळीच भुमिका मराठा तरुणांना मनोमन पटली. त्यामुळेच त्यांनी आज पक्षीय राजकारण बाजुला ठेवत प्रचंड संख्येने हजेरी लावली. यात महिलाचा सहभागही कमी नव्हता. अक्षरशः पाऊस सुरु झाला तरी मेटे यांचे संपूर्ण भाषण होईपर्यंत एक माणुसही जागेवरून हलला नाही.
नियोजनाची सगळी कमान मेटेंवरच
बीडमध्ये अनेक प्रस्थापित पुढारी आहेत. त्यांच्याकडे मोठ मोठ्या संस्था आहेत. त्यामुळे मोर्चे, आंदोलने यशस्वी करायला त्यांना कुठेही जाऊन बैठका घ्याव्या लागत नाहीत. संस्थेतील कर्मचार्यांना ऑर्डर सोडली की मोर्चात माणसंच माणसं दिसतात. पण आ.मेटेंबाबत विचार करायचा झाला तर सगळं काही नियोजन त्यांनाच स्वतःला बघावे लागते. अगदी मुंबईचे लोक मोर्चात आलेत त्यांना मुक्कामाची जागा ते मोर्चेकर्यांना हळदीचं दूध, सॅनीटायझर, मास्क अगदी कसलाही गोंधळ न होता वाटप करणे. शिवाय एक एक माणूस या मोर्चात कसा येईल ते पाहणे. अहो घरच्या लग्नातही लोक लवकर वाहनात बसत नाहीत. इथे तर कोरोना, पाऊस आणि इतर कांड्या पिकवलेल्या वातावरणात लोक स्व खर्चाने मोर्चाला आले. असा हजारोंचा मोर्चा काढणे सोपे काम नाही. त्यामुळे प्रस्थापित पुढार्यांना मेटेंची ताकद आज कळून चुकली असेल. पण मान्य करायचं धाडस कुणाच्या अंगात नसेल.