इच्छा नसतानाही अनेकांना करावी लागतेय विनंती!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र


पोलीस अधिकार्‍यांची झाली अडचण : आवडीच्या ठाण्यासाठी बोली लागण्याची शक्यता
केशव कदम । बीड

दि. 12 : फौजदार ते निरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकार्‍यांचा विहित कालावधी पूर्ण झाला आहे, तसेच ज्यांचा कालावधी पूर्ण झालेला नाही पण जिल्हांतर्गत बदलीसाठी इच्छूक आहेत. अशा पोलीस अधिकार्‍यांनी विनंती अर्ज सादर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी दिले आहेत. मात्र बदलीची इच्छा असेल नसेल तरीही सर्वच अधिकार्‍यांना विनंती बदलीचा अर्ज करावा लागणार आहे, अशी खात्रीलायक सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे आपल्या आवडीचे ठाणे मिळवण्यासाठी अनेकांची धडपड सुरु असून मोठ मोठ्या बोल्या लावल्याशिवाय ठाणं मिळणार नसल्याची कुजबूज सुरु असल्याने अधिकारी वर्ग अडचणीत सापडला आहे.

फौजदार ते निरीक्षक हा पोलीस ठाणे किंवा शाखा येथे दोन वर्ष व स्थानिक गुन्हे शाखा, विशेष शाखा यांच्यासाठी तीन वर्ष कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. ज्यांचा कालावधी पुर्ण झालेला आहे. व ज्यांना सध्याच्या ठिकाणाहून जिल्हांतर्गत बदलीसाठी इच्छूक आहेत. अशा पोलीस अधीकार्‍यांनी जिल्हांतर्गत सर्वसाधारण बदल्या-2021 साठी विनंती अर्ज 14 जून 2021 पर्यंत सादर करण्याचे अवाहन पोलीस अधीक्षक यांनी केले आहे. मात्र जिल्ह्यातील कित्येक पोलीस निरीक्षकांनी, सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी आपले ‘राजमार्ग’ वापरुन सोईच्या ठिकाणी नियुक्ती मिळविण्यासाठी खूप आधीपासून मोर्चेबांधणी चालविली आहे. आता विनंती बदल्यामध्ये कमाईच्या ठाण्यासाठी फिल्डींग लावलेल्या पोलीस निरीक्षकांच्या सोईच्या बदल्या कशा होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

विशेष पथकही बदलणार
पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने गोदापट्ट्यात केलेल्या करामती आता उघड होऊ लागल्या आहेत. त्यामुळे या पथकाच्या प्रमुखांना देखील झटका बसण्याची शक्यता आहे. पथकाची जबाबदारी आपल्याकडे मिळावी म्हणून अनेकांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे पथक व स्थानिक गुन्हे शाखेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

कमाईच्या ठाण्यावर अनेकांचा डोळा
बीड ग्रामीण, पिंपळनेर, बीड शहर, गेवराई, चकलांबा, तलवाडा, माजलगाव ग्रामीण, नेकनूर, दिंद्रुड, या ठाण्यात मोठ्या प्रमाणावर कमाईची संधी असते. त्यामुळे या ठाण्यावर अनेकांचा डोळा असतो. तर शिवाजीनगर, अंभोरा, अंमळनेर, परळी, वडवणी, केज, युसूफवडगाव आदी या ठाण्यांकडे मात्र कानाडोळा केला जातो.

अनेकांनी घेतल्या पुढार्‍यांच्या ‘भेटी-गाठी’
आपल्या आवडीचे ठाणे मिळावे म्हणून अनेकांनी पुढार्‍यांच्या तर आपल्या कामाचा अधिकारी मिळावा म्हणून पुढार्‍यांनी अधिकार्‍यांच्या शिफारशी केल्या आहेत. अशा फिक्स झालेल्यांसाठी केवळ बदली आदेशाची प्रतीक्षा आहे. त्यातही एकाच व्यक्तीला अनेक अधिकारी भेटत असल्याने त्यांच्यातही रस्सीखेच पहायला मिळत आहे. मुळात अधिकारी वर्ग पुढार्‍यांच्या शिफारशींनी ठाणे मिळवणार असतील तर जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्थेचे पुढील काळात धिंडवडे निघालेच म्हणून समजा.

एक निरीक्षकासह सहा
उपनिरीक्षक बदलीस पात्र

बीड जिल्हा पोलीस दलातील फक्त एक निरीक्षक व पाच पोलीस उपनिरीक्षक यांचा ठाण्यातील विहित कार्यकाळ संपलेला आहे. त्यामुळे सहा अधिकारी बदलीस पात्र आहेत. मात्र विनंती बदलीसाठी सक्ती केलेली असल्याने सर्वांनाच विनंती बदलीचा अर्ज करावा लागत आहे.

एसपींच्याही बदलीची चर्चा
जिल्हा पोलीस दलातील अनेकांच्या विनंती अर्जावरून बदली करण्याचा मोसम सुरु असतानाच बीडचे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्याही बदलीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कोरोना काळात रस्त्यावर न उतरणे, कुठल्याही गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट न देणे, राजकीय नेत्यांना फेस करता न येणे, अशा अनेक प्रकारामुळे वारंवार पालकमंत्र्यांची अडचण होत आहे. त्यामुळे नव्या एसपींचा देखील शोध सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाणेप्रमुख वेगळ्याच संकटात सापडलेले आहेत.

विनंती बदलीचा घाट कशासाठी?
बदलीस पात्र नसलेल्यांना देखील विनंती अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. अशा अधिकार्‍यांनी सगळी ‘तजवीज’ पूर्ण केली तर त्यांना तिथेच ठेवणे, किंवा त्यापेक्षा कुणी वरचढ असेल तर त्याला त्या ठाण्यात नियूक्ती देणे, असा घाट घातला जातोय. उद्याचालून बदली झाली तरी कुणाला मॅटमध्ये जाण्याची संधी मिळू नये हा त्यामागचा खरा डाव आहे.

Tagged