atyachar

अत्याचारासह विनयभंगाच्या घटनांनी केज तालुका हादरला

केज क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


केज दि.23 : आज महिलांसह मुली सुरक्षीत नसल्याचे वारंवार घडणार्‍या घटनावरून दिसून येते. केज तालुक्यात एकाच दिवशी विविध ठिकाणी घडलेल्या अत्याचार, विनयभंगाच्या घटनांनी हादरला आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस तपास करत आहेत. अशा नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

चुलत दिराने केला
भावजयीचा विनयभंग

केज : तीस वर्षीय विवाहित महिला ही घरी स्वयंपाक करीत असताना तिच्या चुलत दिराने विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी (दि.23) घडली. तसेच पुन्हा एकटी सापडल्या सोडणार नाही; असे म्हणत आरोपीने शिवीगाळ करून मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून नराधम चुलत दिराच्या विरुद्ध गु. र. नं. 360/2021 भा. दं. वि. 452, 354, 354 (अ), 323, 504 व 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोनि.प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस रुक्मिणी पाचपिंडे या पुढील तपास करीत आहेत.

अल्पवयीन मुलीला पुण्यात
नेऊन चार महिने अत्याचार

केज – 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस पुणे येथून पळवून नेऊन तिच्यावर चार महिने वारंवार शारीरिक अत्याचार केला. पोलिसांनी पुणे येथून मुलीची सुटका करीत आरोपीला जेरबंद केले. श्रीराम संतराम वरपे ( रा. कोरडेवाडी ता. केज ) आरोपीचे नाव आहे. त्याने 22 मार्च 2021 रोजी मध्यरात्री फुस लावून पळवून नेले. याप्रकरणी केज पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आरोपीचा तीन – चार वेळा तपास काढून ही ते न मिळाल्याने पुण्याहून पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते. दरम्यान, आरोपी व मुलगी ही लोणीकाळभोर येथे असल्याची माहिती मिळताच 21 जुलै रोजी पोनि.प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.संतोष मिसळे, जमादार बाळकृष्ण मुंडे, जमादार दिनकर पुरी, पोना.मंदे यांचे पथक पुण्याला रवाना झाले. गुरुवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास या पथकाने छापा मारून आरोपी श्रीराम वरपे यास मुलीसह ताब्यात घेऊन केज पोलीस ठाण्यात हजर केले. पोलीस चौकशीत श्रीराम वरपे याने या अल्पवयीन मुलीस लोणीकाळभोर ( जि. पुणे ) येथे नेऊन तिला एका रुममध्ये ठेवत चार महिन्यापासून तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार अत्याचार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी सदर गुन्ह्यात बलात्कार, पोस्को व अनुसूचित जाती – जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी श्रीराम वरपे यास केजच्या न्यायालयासमोर हजर केले असता त्यास 27 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मुकादमाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
केज : ऊसतोड कामगार कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटणा घडली. या प्रकरणी ढाकेफळ येथील ऊसतोडणी मुकादम अशोक दादाराव थोरात याच्या विरोधात केज पोलीसात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीला घरी सोडतो म्हणून या मुकादमाने नांदूरघाटहून सदर मुलीला सोबत घेतले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पीडीतेच्या आईने दिली. यावरुन केज पोलीसात हा गुन्हा दाखल झाला.

Tagged