lab-corona4

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट ; मृत्युसंख्या चिंतजनक!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र


बीड दि.24 : राज्यभरामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे, परंतू मृत्युसंख्या ही चिंताजनक आहे. शनिवारी (दि.24) राज्यात 6 हजार 269 नवीन रुग्ण आढळून आले. तर 7 हजार 332 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरच राज्यातील एकूण अ‍ॅक्टिव्ह करोना बाधित रुग्णांची संख्या 93 हजार 479 इतकी झाली आहे. तर 224 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात करोना बाधितांची संख्या स्थिरावून ती काहीशी घटत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. तसेच बरे होणार्‍या रुग्णांचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. एकीकडे असे दिलासादायक चित्र असले तरी दैनंदिन मृत्यूची संख्या मात्र तितकीशी घसरताना दिसत नाही. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत एकूण 6 हजार 269 नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. या बरोबरच आज एकूण 7 हजार 332 इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, दिवसभरात एकूण 224 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या 224 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण 60 लाख 29 हजार 817 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.35 टक्के एवढे झाले आहे.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात
राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या खाली आली असून ती 93 हजार 479 इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा 15 हजार 714 इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 11 हजार 682 इतके रुग्ण आहेत. तर, त्यानंतर ठाणे जिल्ह्यात 11 हजार 304 रुग्ण सक्रिय आहेत. सांगलीत ही संख्या 10 हजार 619 इतकी आहे. तर, मुंबई महापालिका हद्दीत सध्या 8 हजार 313 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सातार्‍यात ही संख्या 7 हजार 296, अहमदनगरमध्ये 4 हजार 998 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, रायगडमध्ये 2 हजार 548, रत्नागिरीत 2 हजार 489, सिंधुदुर्गात 2 हजार 372, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 137 इतकी आहे. तर, बीड जिल्ह्यात 1 हजार 335 इतकी आहे, नागपूर जिल्ह्यात ही संख्या 1 हजार 708 इतकी झाली आहे. औरंगाबादमध्ये 613, नांदेडमध्ये ही संख्या 444 इतकी आहे. जळगावमध्ये 519, तसेच अमरावतीत ही संख्या 131 इतकी आहे. राज्यात सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या 9 वर आली आहे.

राज्यात 5 लाख 27 हजार
754 व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 66 लाख 44 हजार 448 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 58 हजार 079 (13.42 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 27 हजार 754 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, 3 हजार 621 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Tagged