राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना आडवून पैशाची मागणी; दोघे अटक

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

रांजणीजवळ महामार्ग पोलीसांची कारवाई, एकजण फरार
बीड
दि.20 : दिवसाढवळ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना आडवून त्यांच्याकडे बळजबरीने, धमकावून पैशाची मागणी केली जात होती. याची माहिती महामार्ग पोलीसांना मिळताच त्यांनी रांजणी परिसरातून दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले. तर एकजण फरार झाला. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
विक्की दत्तात्रय आठरे (वय 28 रा.आसरानगर पाथर्डी, जि.नगर), नितीन सुभाष जगताप (वय 27 रा.नविन कावसान ता.पैठण जि.औरंगाबाद) यांना ताब्यात घेतले असून गणेश भाबड (वय 25 रा.आगसखांड.ता.पाथर्डी जि.नगर) हा फरार झाला आहे. वरील तरुण शुक्रवारी राष्ट्रीय महामार्गावरील रांजणी परिसरामध्ये वाहने आडवून त्यांना धमकावून पैशाची मागणी करत असल्याची माहिती नितीन विजय वाणी या टेम्पो चालकाने पाडळसिंगी टोलनाक्यावर असणार्‍या महामार्ग पोलीसांनी दिली. त्यांनी तातडीने रांजणीकडे धाव घेतली. यावेळी वरील आरोपींनी काही गाड्यांना अडवल्याचे दिसून आले. यातील विक्की व नितीन यांना ताब्यात घेताच गणेशने पलायन केले. तसेच त्यांची दुचाकी (एमएच-15 इएल-8056) जप्त केली. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. ही कारवाई महामार्ग पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Tagged