raosaheb danave

गोपीनाथ मुंडे राजकारणात नसते तर जवखेडच्या माऊलीच्या पारावर मी हरीपाठ म्हणत बसलो असतो

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं प्रतिपादन
जालना/औरंगाबाद : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे नेहमीच आपल्या खास शैलीतील बोलण्यासाठी प्रसिध्द आहेत. भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान त्यांनी असेच वक्तव्य केले. येथील पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, कदाचित मुंडे साहेब राजकारणात नसते तर आम्ही आमच्या गावच्या मारुतीच्या पारावर हरिपाठ म्हणत बसलो असतो. गेली 35 वर्षे या जिल्ह्यातील लोकांनी आमदार, खासदार केलं. तुम्ही मला आमदार, खासदार केलं नसतं तर मी रेल्वे राज्यमंत्री झालो असतो? मी कोयला मंत्री झालो असतो? मी काय ग्राहक संरक्षण मंत्री झालो असतो? तुम्ही निवडून दिलं नसतं आणि गोपीनाथ मुंडे राजकारणात नसते तर जवखेडच्या माऊलीच्या पारावर मी हरिपाठ म्हणत बसलो असतो. मी कलकत्ता, लखनऊ, दिल्ली या कितीही गोष्टी करत असलो, कितीही वर गेलो तरी माझ्या मतदारांना मी विसरणार नाही, अशी ग्वाही रावसाहेब दानवे यांनी दिली.


पुढे बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, पतंग आकाशात असते पण जमिनीवर उभ्या असलेल्या माणसाच्या हातात तिची दोरी असते. पतंगाला दिशा देण्याचं काम जमिनीवरचा माणूस करतो. जोपर्यंत जमिनीवरच्या माणसाच्या हातात पतंग आहे. तोपर्यंत पतंगाला दिशा आहे. पण जेव्हा पतंगाची दोरी सुटली की तर पतंग कोणत्या गटारेत पडेल सांगता येत नाही. आम्हा पुढार्‍यांची अवस्था अशी आहे. तुमच्या हातात दोर नीट आहे, म्हणून आमचा खेळ सुरू आहे. तुम्ही दोरा सोडला तर आम्ही कुठे जाऊन पडू सांगता येत नाही. त्याचीच जाणीव ठेवून आम्ही मंत्रिमंडळात काम करत असतो, असं ते म्हणाले.


शिवाय दिवंगत गोपीनाथ मुंडे समर्थकांमध्ये बिलकूल नाराजी नसल्याचं त्यांनी सांगितलं. जालना येथे काल (गुरुवारी) भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान पंकजा मुंडे समर्थकांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे फोटो दाखवून जन आशीर्वाद यात्रे विरोधात घोषणाबाजी केली होती. याच घोषणेचा संदर्भ देऊन रावसाहेब दानवे यांना डॉक्टर भागवत कराड यांना प्रीतम मुंडे यांना डावलून मंत्रीपद दिल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी आहे का? असा प्रश्न करण्यात आला होता. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ज्यात त्यांनी मुंडे समर्थकांमध्ये कुठलीही नाराजी नसल्याचं अधोरेखित केलं. दरम्यान दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीत ज्या लोकांनी घोषणाबाजी केली ते भाजपचेच असतील असे मला वाटत नाही. आमच्यासारख्या राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात कोणीही येऊन काहीही करू शकतो, असे स्पष्टीकरण देखील दानवे यांनी यावेळी दिलं.


दरम्यान गुरुवारी परभणीहुन जालना जिल्ह्यात प्रवेश करणार्‍या जन आशीर्वाद यात्रेचे स्वागत भाजप कार्यकर्त्यांकडून करण्याची जय्यत तयारी झाली होती. दरम्यान स्वागत समारंभ अगोदरच पाच ते सहा युवकांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा हातात धरून गोपीनाथ मुंडे अमर रहे तसेच भगवानगडाची गद्दारी करणार्‍यांना गद्दारी पचत नाही असं म्हणत घोषणाबाजी केली. यावेळी या कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणा देखील दिल्या होत्या. दरम्यान पुढच्या काही वेळात हे कार्यकर्ते बाजूला झाले, त्यांना कोणीही आडवण्याचा प्रयत्न केला नाही.

Tagged