वडवणी दि.6 नदी पात्रातील बंधार्यात बुडणार्या मुलास वाचविणारेच बुडाल्याची मन सुन्न करणारी घटना वडवणी तालुक्याती पिंपरखेड येथे सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास उघडकीस आली. सुदैवाने यात बुडणारा मुलगा वाचला असून तिघाजणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
रविवारी रात्रीच्यासुमारास तालुक्यात अतिवृष्टी झाली. तब्बल 176 मिमी पाऊस झाला. यामुळे मामला तलाव तुडूंब भरून खळखळून वाहत असल्याने या नदीचे पाणी पिंपरखेड नदीपात्रात मोठ्या प्रमाणात एकत्रीत होते. गावाजवळील नदीपात्रात बंधारा आहे. सोमवार बंधार्यामध्ये गावातील अजय काळे (वय 15) हा मुलगा बुडत असल्याचे पाहून अजय मधुकर खळगे (वय 25), व भैय्या उजगरे (वय 22) या दोघांनी बंधार्यात उडी मारली. हे दोघेजणही बुडत असल्याचे पाहून अजय खळगेचे वडील मधुकर खळगे (वय 55) यांनी त्यांना वाचविण्यासाठी उडी मारली. यामध्ये मधुकर खळगे हे सुध्दा बुडाले. ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेऊन मधुकर खळगे यांना बाहेर काढून खाजगी रूग्णालयात दाखल केले. माञ त्याची प्राणज्योत मालवली होती. तर अजय खळगे व अजय उजगरे हे दोघे जण बेपत्ता होते. घटनेची माहिती मिळताच गावातील तरूण यांनी शोध मोहीम घेतली. तब्बल तीन तासानंतर देवडी गावाजवळ नदी पात्रात मासेमारी साठी लावलेल्या जाळ्यात बेपत्ता युवकाचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी तहसीलदार प्रकाश सिरसेवाड सह प्रशासनाकडून शोध कार्य सुरू होते. तिघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.