तलवाडा ग्रा.पं.च्या ग्रामसेवकासह लिपिकाविरुद्ध गुन्हा

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे

गेवराई तहसिलदारांचा आदेश डावलणे अंगलट

गेवराई : नैसर्गिक आपत्ती काळात तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांचा आदेश डावलल्या प्रकरणी तालुक्यातील तलवाडा ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकासह लिपिकाविरुद्ध नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजयकुमार मस्के हे ग्रामसेवक तर तुळशिराम वाघमारे हे लिपीक म्हणून तलवाडा ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत आहे. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तलवाडा परिसरात अतिवृष्टी झाल्याने तलवाडा येथील पाझर तलाव फुटण्याची शक्यता होती. त्यामुळे ग्रामसेवक मस्के, लिपिक वाघमारे यांना मुख्यालयी थांबण्याचे निर्देश तहसीलदार सचिन खाडे यांनी दिले होते. परंतू, स्वतः खाडे व तलाठी सुभाष वाकोडे, मोल कुरुलकर, कोतवाल गजानन शिगने हे ५ वाजता तलावास भेट देण्यासाठी गेले असता ग्रामसेवक मस्के व लिपिक वाघमारे हे परस्पर निघून गेले. त्यांनी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांचा आदेश डावलला म्हणून तलवाड्याचे तलाठी सुभाष वाकोडे यांनी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून ग्रामसेवकासह लिपिकाविरुद्ध नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Tagged