नदीत वाहून गेलेल्या गुराख्याचा दुसर्‍या दिवशी सापडला मृतदेह

न्यूज ऑफ द डे परळी बीड


परळी महसुल,न.प.अग्निशामक, ग्रामीण पोलीसांची मोठी मोहिम

परळी दि.8 : तालुक्यातील पांगरी वाण नदीच्या बंधार्‍या जवळ एक गुराखी शेतातून जनावरांना घरी घेऊन जाताना वाहून गेला होता. ही घटना गुरुवारी (दि.7) सायंकाळी घडली होती. तालुका महसूल प्रशासनाला याची खबर मिळताच घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहिम सुरु केली. रात्री उशीरापर्यंत मृतदेह आढळून आला नाही. त्यामुळे शोधमोहिम थांबवावी लागली होती. दुसर्‍या दिवशी सकाळी शोध सुरु केला असता मृतदेह आढळून आला.
ज्ञानोबा शंकर शिंदे (वय 55 रा.लऊळ ता.माजलगाव) असे गुराख्याचे नाव आहे. ज्ञानोबा शिंदे शेतातून गुरे चारुन घरी येत असताना वाण नदीत वाहून गेला. स्थानिक नागरीकानी नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, तलाठी डिंगाबर साबणे व नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी अग्निशामक पथकाचे सुनिल अदोडे यांना खबर दिली होती. गुरुवारी नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल होऊन चार ते पाच तास शोध घेतला, पण नदीला पाणी जास्त असल्यामुळे व रात्र होत असलेल्याने ही शोधमोहिम थांबवावी लागली होती. परंतु शुक्रवारी सकाळी पहाटेच परत या गुराख्याचा शोध मोहिम सुरु करण्यात आली. नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन पथकाला अखेर मृतदेह आढळून आला. यासाठी तहसील, पोलिस व परळी नगर परिषद प्रशासनाने अथक परिश्रम घेतले आहे. मयत ज्ञानोबा शिंदे यांचा मृतदेह पोलीस पंचनामा करुन शवविच्छदनासाठी पाठवण्यात येईल असे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांनी सांगितले आहे.

Tagged