नांदेड- देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांचा तब्बल 41 हजार 933 मतांनी पराभव केला आहे.
काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात होते. त्यामुळे चव्हाण यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची करत देगलूरमध्ये मागील काही दिवसांपासून तळ ठोकत अनेक प्रचारसभा केल्या. महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनीही भाजपकडून होणार्या आरोपांना आक्रमकपणे प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. अखेर चव्हाण यांना आपला बालेकिल्ला राखण्यात यश मिळालं आहे.
या निवडणुकीच्या प्रचारात स्थानिक मुद्द्यांसह राज्य पातळीवरील मुद्द्यांवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. भाजपकडून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतरही अनेक नेते प्रचाराच्या मैदानात उतरले होते. मात्र भाजपला हा मतदारसंघ काबीज करता आला नाही.
कोणाला किती मते मिळाली?
महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना 1 लाख 8 हजार 989 मतं मिळाली, तर भाजपचे सुभाष साबणे यांना 66 हजार 872 मतं मिळाली. तिसर्या क्रमांकावर वंचितचे उमेदवार डॉ.उत्तम इंगोले हे राहिले. त्यांना 11 हजार 347 मतं मिळाली. दरम्यान, या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. करोना प्रतिबंधक नियमांमुळे मिरवणुकीवर बंदी असली तरी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला आहे.