vaijenathrao shinde

कर्मवीर वैजेनाथराव शिंदे यांचे निधन

न्यूज ऑफ द डे माजलगाव

माजलगाव- माजलगाव तालुक्यातील लवूळ येथील गजानन शिक्षण मंडळाचे संस्थापक तथा विद्यमान सचिव वैजेनाथराव रंगनाथराव शिंदे यांचे मंगळवारी (दि. 2 नोव्हेंबर) रोजी वृध्दपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 94 वर्षांचे होते.


वैजेनाथराव शिंदे यांनी लवूळ आणि परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून 1963 साली गजानन शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली होती. त्याचबरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाची देखील सोय केली होती. त्यामुळे तालुक्यात ते कर्मवीर या नावाने ओळखले जात होते. या संस्थेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज मोठ मोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी लवूळ ग्रामपंचायतचे सलग 30 वर्ष सरपंचपद देखील सांभाळलेले होते. लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन म्हणूनही त्यांनी अनेक वर्ष काम केलेले आहे. माजलगाव बाजार समितीचे सभापतीपद देखील त्यांनी काही वर्ष भुषविलेले होते. सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. त्यांच्या पश्चात पत्नी राजुबाई शिंदे आणि मुलगा विश्वजीत शिंदे आहेत. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी 10 वाजता लवूळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. शिंदे परिवाराच्या दुःखात “कार्यारंभ’ परिवार सहभागी आहे.


आ.प्रकाश सोळंके यांच्याकडून शोक व्यक्त
वैजेनाथराव शिंदे यांच्या निधनाने आमच्या परिवारातील एक ज्येष्ट मार्गदर्शक व्यक्ती आम्ही गमावलेला आहे. माझ्या वडीलांचे ते निष्ठावंत सहकारी होते. त्यांचा सहकार क्षेत्राबरोबरच शेतीवरही मोठा अभ्यास होता. त्यांनी शेतीमध्ये अनेक सुधारणा घडवून आणलेल्या होत्या. गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्या काळात त्यांनी वस्तीगृह स्थापन केले होते. अतिशय सज्जन, सालस व्यक्तीमत्वाला माजलगाव मतदारसंघ मुकला आहे. मला वैयक्तिक या घटनेचे मोठे दुःख आहे, अशा शब्दात माजलगावचे आ.प्रकाशदादा सोळंके यांनी निधनाबद्दल शोक व्यक्त केला.