बीड, दि.23 ः जिल्ह्यात रेल्वे येणार म्हटलं की सगळ्यांना चेष्टाच वाटते. परंतु आता खरोखरीच रेल्वे येण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. अहमदनगर ते आष्टी या मार्गादरम्यान 60 किलोमीटरपर्यंत हायस्पीड रेल्वे धावणार आहे. सध्या या मार्गावर दररोज इंजिनाची टेस्टींग होत आहे. आता हायस्पीड रेल्वे धावल्यास खर्या अर्थाने हा मार्ग रेल्वेसाठी तयार झाला हे त्यातून सिध्द होणार आहे.
रेल्वे स्थळावर दररोज काम करणार्या काही अधिकार्यांनी माहिती देताना सांगितले की, यापुर्वी नगर ते नारायणडोह ही 12 किलोमीटर आणि नगर ते सोलापूरवाडी ही 35.5 किलोमीटरची चाचणी घेण्यात आली होती. आता नगर ते थेट आष्टीपर्यंतचे रुळाचे काम पूर्ण असून याच 60 किलोमीटरच्या अंतरात हायस्पीड रेल्वेची चाचणी होण्याची शक्यता आहे. किमान पुढच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही चाचणी शक्य असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. दोन वर्षापुर्वी अहमदनगर ते सोलापूरवाडी दरम्यान हायस्पीड रेल्वेची चाचणी घेण्यात आली होती. 1995 मध्ये या रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळी 353 कोटी रुपये खर्चाचा हा रेल्वेमार्ग होता. मात्र कुठल्याच सरकारांनी याकडे लक्ष न दिल्याने हा रेल्वेमार्ग 2800 कोटी रुपये खर्चावर जाऊन पोहोचला आहे.