वीज जोडणी न केल्यास शेतकरी पायतानाने अधिकार्‍यांना झोडपतील

केज न्यूज ऑफ द डे

माजी खा.राजू शेट्टी यांचा इशारा; नाव्होलीत शेतकरी संताप मेळावा

केज : महावितरण कंपनीने सक्तीची वीज बील वसुली चालू केल्यामुळे शेतकर्‍यांवर रब्बी हंगामात संकट आले. महावितरण कंपनीने शेतकर्‍यांवरील हा अन्याय तत्काळ थांबवावून त्यांचे वीज कनेक्शन पूर्ववत जोडून द्यावेत अन्यथा शेतकरी पायतान घेऊन अधिकार्‍यांना झोडपून काढतील, असा आक्रमक इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

नाव्होली (ता.केज) येथील संघटनेसह बळीराजा सामाजिक प्रतिष्ठानचा शेतकरी संताप मेळावा शुक्रवारी पार पडला. या मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर जेष्ठ नेत्या प्रा.सुशीला मोराळे, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे, जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे,  मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस, रवींद्र इंगळे, अनिल रांजनकर, अशोक गीते, प्रमोद पांचाळ, अशोक साखरे, सामाजिक कार्यकर्ते जे. डी. शहा, सी.बी.एस.इनामदार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
राजू शेट्टी म्हणाले, रब्बी हंगामात कुठलीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीरपणे महावितरण कंपनीकडून शेतकर्‍यांच्या कृषीपंपाचे वीज कनेक्शन कपात करून सक्तीची वीज बिल वसुली करणार्‍या महावितरण कंपनीच्या अन्यायाविरुद्ध येथील सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधी तोंडाला कुलूप लावून गप्प का? असा सवाल त्यांनी केला. गेल्या महिनाभरात मराठवाडा-विदर्भात सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या परिषदेमुळे व रविकांत तुपकर यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनामुळे राज्य सरकारने सोयाबीनवरील स्टॉक लिमीट उठविण्याचा निर्णय घेतला. त्याचा शेतकर्‍यांना फायदा होत आहे. शेतकर्‍यांनी अशाच प्रकारे संघटीत होऊन थोडा संयम बाळगावा सोयाबीनचे दर आणखी वाढतील. आश्यकतेनुसार सोयाबीनची विक्री करावी असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित शेतकर्‍यांना केले. यावेळी प्रा.सुशिला मोराळे, पूजा मोरे, गजानन बंगाळे, सुमंत धस, जे.डी.शहा यांची भाषणे झाली. यावेळी ऊसाला एकरकमी एफआरपी द्यावी, जिल्ह्यातील सर्व बंद साखर कारखाने चालू करून शेतकर्‍यांचा ऊस विहीत वेळेत गाळप करावा. अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी. गेल्या वर्षीचा व यावर्षीचा पीक विमा शंभर टक्के खात्यावर द्यावा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शेतकर्‍यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्या संताप मेळाव्यात करण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बळीराजा प्रतिष्ठानचे सी.बी.एस.इनामदार, रणजित बिक्कड, अंकुश बिक्कड, कल्याण केदार, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे केज शहराध्यक्ष फेरोज पठाण, भागवत पवार, सुग्रीव करपे, नवनाथ काकडे, चंद्रकांत अंबाड,भारत मुळे, बिभीषण इंगळे,विश्वास जाधव आदींनी परिश्रम घेतले.

अंबाजोगाईत सोमवारी हल्लाबोल मोर्चा
महावितरणच्या अधिकार्‍यांच्या जुलमी अन्यायाविरुद्ध व सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात अंबाजोगाईत महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर सोमवारी सकाळी 11 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले असून या मोर्चाला सर्व शेतकर्‍यांनी एकजूट दाखवून ताकतीने यावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केले.

Tagged