कोरोनाचा विषाणू मरेल पण मनातला कसा मारणार?

बीड राजकारण

खासदार, आमदार, जिल्हाधिकार्‍यांना डावलून प्रयोग शाळेच्या कोनशिलेवर कुणाचीही नावे
शासकीय तिजोरीतून खर्च झालेल्या पैशातून राजकीय पदाधिकार्‍यांची नावे कशासाठी?

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचं उद्घाटन झाले. कोरोनाचा विषाणू शोधण्यासाठी ही प्रयोगशाळा तयार करण्यात आली. परंतु उद्घाटनालाच मनातील विषाणुंनी उचल खाल्ल्याने कोनशीलेवर खासदार, स्थानिकचे आमदार, गेवराईचे आमदार, विधान परिषदेतील भाजपचे दोन सदस्य, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी या कुणाचीही नावे नाहीत. मात्र कोरोनाच्या महामारीत ज्यांचं काम शुन्य अशा अनेकांची कोनशीलेवर नावे आल्याने पालकमंत्र्यांना नेमकं काय सिध्द करायचं आहे असा प्रश्न विचारला जातोय. कोरोनाचा विषाणू एकवेळ मारता येईल पण मनातील विषाणू कसा मारायचा अशा प्रतिक्रीया जिल्हाभरातून उमटत आहेत.
   स्वाराती प्रशासनाने कोनशिलेवर अशा व्यक्तींची नावे टाकली आहेत कुणाही सामान्य व्यक्तींना ही नावे वाचून हसू येईल. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार यांचं कोरोनाच्या महामारीतील योगदान जिल्ह्याने पाहीले आहे, अनुभवले आहे. जिल्हाधिकारी तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख आहेत. कोरोनाकाळात ज्याकाही उपाययोजना राबविल्या त्या केवळ जिल्हाधिकार्‍यांच्या सहीने राबविल्या आहेत. अंबाजोगाईत लॅब असावी याचा प्रस्तावही त्यांच्या सहीशिवाय गेला नसणार. आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमालाही त्यांचीच प्रमुख उपस्थिती होती. असे असतानाही कोनशिलेवर साधं जिल्हाधिकार्‍यांचं नाव असू नये? उद्घाटनाला बोलावून जिल्हाधिकार्‍यांचा एवढा मोठा अवमान? जिल्हाधिकारी थोडेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी होते त्याचं नाव अशा प्रकारे डावलण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी हे तर जिवाशी खेळून जिल्ह्याला कोरोनापासून वाचवत आहेत. त्यांच्या पाठीवर अजुनही पालकमंत्र्यांनी कौतुकाची थाप टाकली नाही. पण जिथे नाव टाकण्याचा हक्क होता तोही हिरावून घेतला. किती हा कोतेपणा?
खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्याशी पालकमंत्र्यांचं राजकीय वैर आहे. परंतु त्या 7 लाख मते घेऊन खासदार झालेल्या आहेत. आणि आता त्या मतदान केलेल्याच लोकांच्या खासदार नसून पालकमंत्र्यांच्या देखील खासदार आहेत. पदावर कोण बसलंय यापेक्षा त्या पदाची प्रतिष्ठा राखणे गरजेचे होते. झालेल्या या कृतीतून कुणाचं अवमुल्यन झालं की नाही माहित नाही परंतु पालकमंत्री आणि स्वारातिच्या अधिष्ठाता या पदाचं मात्र नक्कीच अवमुल्यन झालं आहे.
अध्यादेश काय सांगतो?
अशा प्रकारचे राजकारण होऊ नये म्हणून शासनाने 2015 साली एक अध्यादेश काढलेला होता. त्यात स्पष्टपणे म्हटले होते की, शासकीय निधीतून उभारण्यात आलेल्या एखाद्या प्रकल्पाच्या कोनशीलेवर स्थानिकचे विधानसभा सदस्य, स्थानिकचे विधान परिषद सदस्य, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य यांना निमंत्रीत करण्यात यावं. त्यांचं निमंत्रण पत्रिकेत नाव सामाविष्ट करण्यापासून ते त्यांच्या बसण्याच्या जागेपर्यंतची सर्व व्यवस्था राजशिष्टाचारानुसार करावी. त्यांचा सन्मान करावा. आणि हे करण्याची सर्व जबाबदारी कार्यक्रमाच्या आयोजकांवर संबंधीत विभागप्रमुखांवर राहील, असे न झाल्यास संबंधीत विभागप्रमुखांना कारवाईस सामोरे जावे लागू शकते.

खासदार स्वारातीच्या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्ष
खा.डॉ.प्रितमताई मुंडे या स्वारातीच्या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्ष आहेत. त्यांचंही नाव कोनशीलेवर नाही. किंवा त्यांना साधं निमंत्रण देखील नाही. हे कशामुळे झाले? चिल्लर लोकांची नावे कोनशीलेवर आणि आपलं नाही याचं आत्मचिंतन खासदारांनी केलं पाहीजे. विरोधकांना याचा जाब विचारला पाहीजे. ही घटना नरजअंदाज करण्यातून काळ सोकावण्याची शक्यता आहे.

पदाचं अवमुल्यन -अ‍ॅड. अजित देशमुख
अनेक कोनशीलेवर जिल्हाधिकार्‍याचं नाव असतं. मात्र या कोनशीलेवर जिल्हाधिकारी उपस्थित असताना त्यांचं नाव नाही. राजकारण्याकडून जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख या पदाचं अवमुल्यन केलं आहे. वास्तविक जिल्हाधिकार्‍यांच्या सहीशिवाय ही प्रयोगशाळाच अस्तित्वात येऊ शकत नव्हती. अधिष्ठातांचं नाव असेल तर जिल्हाधिकार्‍यांचं का नाही? दोषी अधिकार्‍यावर कारवाई व्हायलाच पाहीजे अशी मागणी जनआंदोलनाचे विश्वस्त अ‍ॅड.अजित एम.देशमुख यांनी केली आहे.

राज्यपाल आणि सभापतींकडे तक्रार करणार – आ.नमिता मुंदडा
सर्वप्रथम अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात प्रयोगशाळा सुरु केल्याबद्दल ना.अमितजी देशमुख यांचे आभार. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लवकर निदान होणे गरजेचे आहे. अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेमुळे बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे लवकर निदान होईल आणि त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरु करणे आता शक्य होईल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राष्ट्रीय आपत्ती जाहीर झालेली आहे. एवढ्या गंभीर परिस्थितीत देखील कोरोना तपासणी प्रयोगशाळेच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात पालकमंत्री ना. धनंजयजी मुंडे हे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांना हाताशी धरून गलिच्छ राजकारण करत आहेत. दि. 05 मार्च 2020 रोजी शासनाने काढलेल्या आदेशानुसार कोणत्याही शासकीय कार्यक्रमात त्या भागातील महिला खासदार, आमदार यांना विशेषत्वाने सन्मानपूर्वक आणि सौजन्याची वागणूक द्यावी असा शिष्टाचार आहे. असे असतानाही आमच्या नेत्या तथा बीडच्या खा. प्रीतमताई मुंडे आणि मी या भागातील विधानसभा सदस्य असूनही आम्हाला प्रयोगशाळेच्या लोकार्पण कार्यक्रमासंदर्भात तसूभरही कल्पना दिली गेली नाही किंवा आमंत्रित केले नाही. कोनशिलेवर देखील आमचे नाव नाही. माझ्या सासूबाई आदरणीय स्व. डॉ. विमलताई मुंदडा यांनी त्यांच्या आरोग्य मंत्रीपदाच्या काळात या रुग्णालयासाठी शेकडो कोटींचा निधी खेचून आणला. प्रशस्त इमारती उभ्या करून गोरगरीब रुग्णांसाठी आधुनिक उपचारांची सोय केली. आमच्या नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे आणि खासदार प्रीतमताई मुंडे यांनी मागील पाच वर्षाच्या काळात कोट्यावधी रुपयांची विकासकामे रुग्णालयासाठी केली. परंतु, त्यात कधीही राजकारण आणले नाही. खरे तर हा कार्यक्रम घेणे गरजेचे नव्हते. राज्यात इतर अनेक ठिकाणी प्रयोगशाळा उभ्या करण्यात आल्या. परंतु त्या ठिकाणी प्रसिद्धीसाठी एवढा गाजावाजा केल्याचे ऐकिवात नाही. कोरोनामुळे देशात हजारो नागरिकांचा बळी गेल्याने दुःखाचे आणि भीतीचे वातावरण आहे. शासनानेही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणताही कार्यक्रम घेण्यास मनाई केली आहे. तरी देखील प्रयोगशाळेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सोशल सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्यात आले नाहीत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या व्यक्तीकडून सामाजिक अंतर राखण्याबाबत काळजी घेतली गेली नाही. या सर्व मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर मी संयोजकांचा निषेध करते. लवकरच मी महिला लोकप्रतिनिधींचा जाणीवपूर्वक अवमान करणार्‍या संयोजकांची राज्यपाल आणि सभापतींकडे तक्रार करणार आहे.

Tagged