बीड,दि.22: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा गट बंड करण्याच्या पावित्र्यात असल्याचा रिपोर्ट गुप्तचर यंत्रणेकडून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना दिला होता. मात्र या दोघांकडूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने शिवसेनेत हे मोठं बंडाचं निशान फडकलंय असे सांगितले जात आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृहखातं हे राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे शिवसेनेच्या संभाव्य बंडाकडे दिलीप वळसे पाटील यांनी दुर्लक्ष केले का? राष्ट्रवादीने हा गेम केलाय का असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र गुप्तचर यंत्रणांनी या संभाव्य बंडाची गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना महिनाभरापुर्वीच कल्पना दिली होती. मात्र या दोघांकडून याकडे कमालीचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे या बंडाची कल्पना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देण्यात आली होती. पवारांनी पाच महिन्यापुर्वी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली होती. मात्र त्यानंतर देखील मुख्यमंत्र्याकडून दुर्लक्ष झाल्याची माहिती राष्ट्रवादीतील सुत्रांनी दिली.
आणखी दोन आमदार शिंदेना जाऊन मिळणार
एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे यापुर्वीच 33 आमदार आहेत. आपल्याकडे शिवसेनेचे 40 आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला होता. त्यांच्या या दाव्याला आता पुष्टी मिळत आहे. कारण शिवसेनेचे आणखी दोन आमदार शिंदेना जाऊन मिळत आहेत. माजी मंत्री संजय राठोड, आणि रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम या दोघांचा यात समावेश आहे. त्यामुळे आता एकट्या शिवसेनेचे 35 आमदार झाले आहेत. प्रहारचे दोन, एक अपक्ष आणि अजून 5 शिवसेनेचे आमदार शिंदे यांना येऊन मिळत आहेत. याशिवाय काँग्रेसमधूनही 8 ते 10 आमदार आपल्याला मिळणार असल्याचा दावा हॉटेलमधील काही आमदारांनी माध्यमांकडे केला आहे.
राज्यपाल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भेटणार
भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आता राजकीय पेचप्रसंगाचे काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर आता राजभवनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून ते सर्वांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्वांना भेटतील, अशी माहिती देण्यात आली.