जामखेड-बीड रोडवरील मोहा परिसरातील घटना
पाटोदा दि.25 ः मागील काही महिन्यांपासून एस.टी.कर्मचार्यांच्या संपावर अद्याप तोडगा निघाला नाही. मात्र एस.टी बसवरील हल्ले थांबायला तयार नाहीत. याबाबत जामखेड सौताडा रोडवरील मोहा शिवारात पाटोदा अगाराच्या बसवर रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला. एसटी कर्मचार्यांचा संप मिटला नसला तरी मात्र कारवाईच्या भीतीपोटी या संपाला विरोध करत अनेक बस चालक व वाहक कामावर हजर झाले आहेत. मात्र अशा हल्ल्यामुळे ते भितीच्या सावटाखाली काम करत आहेत.
24 फेब्रुवारी रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पाटोदा अगाराची बस (एमएच-20 बी.एल 3972) पुणे-पाटोदा ही बस पाटोदा या ठिकाणी चालली होती. याच दरम्यान जामखेड-सौताडा रोडवर ही बस आली असता अंधाराचा फायदा घेत दुचाकीवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी या बसवर दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचेचे नुकसान झाले. बस चालकाने प्रसंगावधान राखत ही बस जामखेड पोलीस ठाण्यात आणली. यावेळी जामखेड पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर प्रवाशांना घेऊन ही बस पाटोद्याकडे रवाना झाली. यापुर्वी देखील हरिनारायण आष्टा हद्दी जवळील गांधनवाडी फाटा येथे जामखेड आगाराच्या बसवर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली होती. त्यानंतर पुन्हा मोहा फाटा येथे दुसर्यांदा बसवर दगडफेक झाल्याने संपातून माघार घेऊन कामावर हजर झालेल्या एस.टी. कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.