मोठी बातमी; युक्रेनमध्ये अडकला बीड जिल्ह्यातील विद्यार्थी

आष्टी देश विदेश न्यूज ऑफ द डे

जिल्हा प्रशासनाकडून संपर्कासाठी प्रयत्न

शुभम खाडे/बीड, अंबाजोगाई
दि.25 : सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून रशियाने युद्ध घोषीत केले आहे. या परिस्थितीत युक्रेनमध्ये बीड जिह्यातील एक विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली आहे तो वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 अनिकेत भाऊसाहेब लटपटे (वय 20) असे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मुळचा आष्टी तालुक्यातील मुर्शदपूर येथील आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेला होता. खारक्यू नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी, खारक्यू, युक्रेन अंतर्गत प्रथम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत होता. त्याठिकाणी युद्धाची घोषणा झाल्याने तो अडकला असून संपर्कात नसल्याची माहिती त्याचे वडील भाऊसाहेब लटपटे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभय जोशी यांच्याकडे दिली आहे. याबाबतची नोंद घेऊन विभागीय आयुक्तालयातील आपत्ती विभागास कळविले असून केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयामार्फत संपर्क करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना सांगितले आहे.

आपत्ती व्यवस्थापनाचे नागरिकांना आवाहन
युक्रेनमध्ये नागरीक अडकलेले असल्यास तत्काळ नातेवाईकांनी जवळच्या तहसिल कार्यालय, उप विभागीय कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपर्क करून कळवावे. जेणेकरून अडकलेल्या नागरीकांना सुखरूपपणे परत भारतात आणण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. याबाबत बीड जिह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते कि, युक्रेनमध्ये अडकलेले त्यांचे नातेवाईकांबाबत तत्काळ जवळच्या तहसिल कार्यालय, उपविभागीय कार्यालयास कळवावे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयास आपत्ती व्यवस्थापन टोल फ्री नं. 1950 वर किंवा 02442222604 या अथवा ई-मेल आयडी rdc.beed2gmail.com या क्रमांकावर संपर्क करून कळवावे. तसेच याबाबत केंद्रिय परराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्ली येथे नागरीकांच्या माहितीसाठी व मदतीसाठी नियंत्रन कक्ष स्थापन केला असून तेथील हेल्पलाईन नंबर 1800118797 (टोल फ्री) +91-11-23012113, +91-11-23014104. +91-11 23017905 आहे. व फॅक्स नंबर +91-11-23088124 हा आहे. व तेथील ई-मेल आयडी situationroommea.gov.in हा आहे. जिल्ह्यातील कोणी नागरीक युक्रेनमध्ये अडकलेले असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.

Tagged