बीड गोळीबार प्रकरण
प्रतिनिधी । बीड
दि.26 : येथील रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणात सतीश बबनराव क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ.भारतभुषण क्षीरसागर, bharatbhushan kshirsagar डॉ.योगेश क्षीरसागर yogesh kshirsagar यांच्यासह सतीश पवार, प्रमोद पवार, विनोद पवार, रवी पवार, आदित्य पवार यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 307 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सतीश क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आठ दिवसापुर्वी मी हेमंत क्षीरसागर यांच्याशी चर्चा करण्यासाठी बंगल्यावर गेलो होतो. त्यावेळी डॉ.भारतभुषण व योगेश हे दोघे बोलत बोलत हॉलमध्ये आले. तेव्हा योगेश क्षीरसागर यांनी माझ्याकडे बोट करून भारतभुषण क्षीरसागर यांच्याशी काही तरी बोलले. ते मी ऐकले नाही. परंतु हेमंत क्षीरसागर यांना फोन आल्यानंतर ते तेथून बाजुला गेले. तेव्हा योगेश क्षीरसागर यांनी मला व फारूक सिद्दीकी यांना आवाज देवून साहेब बोलावत आहेत असे सांगितले. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यानंतर योगेश क्षीरसागर भारतभुषण क्षीरसागर यांना म्हणाले की, हे दोघे हेमंत क्षीरसागर यांच्या सोबत रोज असतात. हेच जास्त फडफड करतात. तेव्हा भारतभुषण आम्हा दोघांना म्हणाले की तुम्ही दोघे हेमंत क्षीरसागर सोबत राहू नका. तेव्हा मी त्यांना म्हणालो की आम्ही कोणासोबतही राहू तुमचा काही संबंध नाही. त्यावेळी योगेश म्हणाले, तुमची दोघांची फडफड लई होऊ लागली. जास्त हवेत उडू नका. आम्हाला माहिती आहे कुणाला कुठे दाबायचे आणि कुठे नाही. तेव्हा मी त्यांना तसे काही नाही असे म्हणालो. तेव्हा योगेश क्षीरसागर म्हणाले की आठ-दहा दिवसात तुम्हाला दाखवतो की आम्ही काय करू शकतो.
त्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता मी व फारूक सिद्दीकी हेमंत क्षीरसागर यांच्या बंगल्यावर जात असताना पंचायत समिती कार्यालयाजवळ हेमंत क्षीरसागर यांची स्कॉर्पिओ पुतळ्याकडे जाताना दिसली. म्हणून मी त्यांना हात केला तेव्हा त्यांनी त्यांची गाडी कलेक्टर ऑफिसच्या परिसरात थांबवली. म्हणून मी व फारूकी माझ्या मोटारसायकलवर हेमंत क्षीरसागर यांच्या गाडीजवळ गेलो. तेव्हा हेमंत आम्हाला म्हणाले कलेक्टर ऑफिसमध्ये काम आहे तिकडे चला. तेव्हा मी व फारूकी हेमंत यांना बोलत बोलत रजिस्ट्री ऑफिसकडून जात असताना तेव्हा या परिसरात सतीश पवार, डॉ.प्रमोद पवार, त्यांचे वडील थांबलेले होते. तेथून आम्ही तिघे कलेक्टर ऑफिसकडे जात असताना सतिश पवार याने ये सिद्दीकी असा आवाज दिला. त्यावर हेमंत क्षीरसागर यांनी तुम्ही थोडे बाजुला थांबा, सतीश पवार ने आवाज दिलाय काय आहे ते पाहतो, असे सांगितले. तेवढ्यात सतीश पवार जवळ आला. आणि म्हणाला काय रे माकडांनो तुम्हाला भारतभुषण व योगेश यांनी त्या दिवशी सांगितलेले समजले नाही का? असे म्हणून वाद घातला. यावेळी प्रमोद पवार याने त्याच्या कंबर पट्ट्यातून हात दिड हात लांब जुनाट तलवार काढून सिद्दीकीला मारली. विनोद पवार, रवि पवार यांच्या हातात लोखंडी रॉड होते. तसेच आदित्य पवार याच्याकडे हॉकी स्टीक होती. तर सतीश पवार याच्याकडे खोर्याचे दांडके होते. मी सिद्दीकला मारताना सोडवण्यासाठी मध्ये गेलो असता वरील सहाही जणांनी मला व सिद्दीकी यांना मारण्यास सुरुवात केली. यावेळी हेमंत क्षीरसागर हे सोडवा सोडवी करू लागले. त्यावेळी सतीश पवार याने त्याच्याकडील काळ्या रंगाची व आदीत्य याने सिल्वर रंगाची बंदूक काढली. दोघांनी फारूकी व मला जीवे मारण्याच्या उद्देशाने फायरिंग सुरु केली. यावेळी सतीश याने मारलेली एक गोळी माझ्या डाव्या पायाला गुडघ्याच्या खाली लागली. तसेच एक गोळी उजव्या पायाला चाटून गेली. त्यावेळी फारूकी सिद्दीकी याला देखील एक गोळी लागली असावी. परंतु त्या बाबत मला नक्की माहिती नाही. त्यानंतर मी खाली पडलो आणि आता सिग्मा हॉस्पिटल औरंगाबाद येथून जवाब देत आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक बाळराजे दराडे करीत आहेत.