यंदाही परळीत महाशिवरात्री यात्रा भरणार नाही

न्यूज ऑफ द डे परळी

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

परळी : बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाचा महाशिवरात्र उत्सव पारंपरिक पद्धतीने यावर्षी ही होणार आहे. कोविड अनुरूप नियमांचे पालन करुन भाविकांसाठी दर्शन व वैद्यनाथ मंदिरचे सर्व उत्सव पारंपरिक पद्धतीने होणार आहे. दरम्यान यावर्षी ही परळीत महाशिवरात्र यात्रा भरणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशातून समोर आले.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील श्री प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी येणाऱ्या शिवभक्तांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात सर्व व्यवस्थेचा आढावा शुक्रवारी अंबाजोगाईच्या अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांच्या अध्यक्षतेखाली वैजनाथ मंदिराच्या हॉलमधील बैठकीत घेण्यात आला. या आढावा बैठकीत महाशिवरात्रीची दर्शनाच्या निमित्ताने काय काय तयारी करण्यात आली आहे, यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांनी सर्व विभाग प्रमुखाकडून माहिती घेतली व योग्य त्या सूचना दिल्या. १ मार्च रोजी महाशिवरात्र उत्सव श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने साजरा केला जाणार आहे. महाशिवरात्रीत वैद्यनाथच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येणार असल्याने श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्यावतीने महिला, पुरुष व धर्मदर्शन अशा तीन रांगा लावण्यात येणार आहे. हजारो भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे म्हणून मंदिराच्या पायऱ्यावर बॅरिकेट उभारण्याचे काम पूर्ण होत आले आहे. १ मार्च रोजी महाशिवरात्र असल्याने वैद्यनाथ मंदिरात दर्शनाची सुविधा करण्यात आली आहे. शहरात यात्रा भरण्यासंदर्भात मात्र या बैठकीत काही निर्णय झाला नव्हता. शासनाचे आदेशानुसार यात्रेसंदर्भातला निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले होते. याबाबत बीड जिल्हाधिकारी यांनी दि.२६ रोजी आदेश काढले असून त्यानुसार यात्रा भरवण्यास परवानगी नसेल असे म्हटले आहे. त्यामुळे यावर्षी ही परळीत महाशिवरात्र यात्रा भरणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

Tagged