घटनास्थळी वरिष्ठ पोलीसांची भेट
अंबाजोगाई दि.10 : अंबाजोगाई तालुक्यातील साकूड येथे काल खुनाचा घटना घडली होती. त्यानंतर आज गुरुवारी (दि.10) पुन्हा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील गडदेवाडी शिवारात रस्त्यालगत हा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सुनिल जायभाये यांनी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेनासाठी स्वारातीमध्ये दाखल केला आहे. मृतदेहाच्या चेहर्यावरील जखमा पाहता खून असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बाबुराव विठ्ठल गडदे (वय 48, रा.चिचखंडी, ता.अंबाजोगाई) असे मयताचे नाव आहे. बाबुराव बुधवारी (दि.9) सकाळी 7 वाजता शेताच्या जवळ असलेल्या बाळूमामाच्या मंदिरात जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्यानंतर परतले नव्हते. गुरुवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात दाखल केला आहे. या प्रकरणी नातेवाईकांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती उपअधीक्षक सुनिल जायभाये यांनी दिली.
सलग दोन घटनांमुळे खळबळ
बुधवारी रात्री अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील साकुड येथे दिपक रामकीशन दगडे या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. त्यानंतर लागलीच गडदेवाडीत मृतदेह आढळून आल्याने वाढलेल्या गुन्हेगारी बाबत नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे.