crime

लिंबू प्रक्रिया उद्योग मंजूरीसाठी शेतकर्‍यांना 14 लाखांना गंडविले!

क्राईम परळी बीड

नाशिक येथील दोन महिलांवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बीड दि.9 : भारत सरकारच्या लघु सुष्म व मोठे उद्योग अंतर्गत केंद्र सरकारकडून 90 टक्के सबसीडीचा लिंबू प्रक्रिया उद्योग मंजुर करुन देतोत, असे म्हणून परळी तालुक्यातील शेतकर्‍यांना नाशिक जिल्ह्यातील दोन महिलांनी 14 लाख 5 हजार रुपयांना गंडविले आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रदिप क्षत्रुगन तांदळे (रा.सारडगाव ता.परळी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मनिषा देविदास तंवर, स्मिता पांडुरंग घोडके (रा.नाशिक)या महिलांनी फोन करुन तुमच्या संस्थेस भारत सरकारच्या लघु व सुष्म व मोठे उद्योग अंतर्गत केंद्र सरकारकडून 90 टक्के सबसीडीचा लिंबू प्रक्रिया उद्योग मंजूर करुन देतोत. असे सांगून संस्थेचे कागदपत्र घेतले. तसेच स्वतः उद्योगासाठी लागणार्‍या जागेची सारडगाव येथे येवून पाहणी केली. खोटे ओळखपत्रे व केंद्र सरकारचे सलंग्न राहुन काम करण्याचे टेक्नीकल एजन्सी असल्याचे कागदपत्र दाखवले. हा उद्योग शासनाकडून मंजूर करण्यासाठी अधिकार्‍यांना पैसे द्यावे लागतील असे म्हणून फोन पे व बँक खात्यावर 14 लाख 5 हजार रुपये घेतले. त्यानंतर वारंवार फोन करुन लिंबू प्रक्रिया उद्योग मंजुरीसाठी विचारले असता उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पैसे परत करण्याची मागणी केली असता तुमचे राजकिय अस्तित्व संपवून टाकू, जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात मनिषा तंवर, स्मिता घोडके यांच्यावर कलम 420, 468, 471, 120(ब), 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि.विशाल शहाणे करत आहेत.

फुकटचं येणार म्हटलं की,
हातातलेही देवून टाकतात

एखादा जास्तीचं काही देण्यास तयार झाला की, लोक लगेच त्याच्या अमिषाला बळी पडतात. तसेच समोर महिला असेल तर मग कशाचाही विचार करत नाहीत. असं सहज, फुकट व जास्तीचं काही मिळत असेल तर नक्कीच आपली फसवणूक होत असल्याचे समजून घ्यावे, अशावेळी काळजीपूर्वक व्यवहार करण्याची गरज आहे. अन्यथा आपली फसवणूक झाली म्हणून समजा.

Tagged