नवरदेवासह मित्रास शेतातून अटक

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाईचे गोळीबार प्रकरण; दोन दिवसांची पोलीस कोठडी

अंबाजोगाई : शहराजवळील सायली लॉन्स या मंगल कार्यालयात दि.26 मार्च रोजी हळदीच्या कार्यक्रमात नवरदेवासह त्याच्या मित्राने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी असलेल्या नवरदेवासह त्याच्या मित्राला अंबाजोगाई शहर पोलिसांनी सोमवारी (दि.5) मध्यरात्री ताब्यात घेतले.

 बालाजी भास्कर चाटे (रा.साकुड ता.अंबाजोगाई) असे अटक केलेल्या नवरदेवाचे तर बाबा शेख (रा.क्रांतीनगर, रा.अंबाजोगाई) असे त्याच्या मित्राचे नाव आहे. हे दोघे साकुड येथील शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने दोघांना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक गोपाळ सूर्यवंशी, स.फौ.सोनेराव बोडके, पोहेकॉ.नरहरी नागरगोजे, किसन घोळवे, पोलीस नाईक गोविंद येलमाटे आदींनी केली आहे.

दोन दिवसांची पोलीस कोठडी
लग्नाचा ‘बार’ उडण्याआधीच नवरदेवाने ‘गोळीबार’ केल्याने ऐन लग्नाच्या तिसर्‍या दिवशी फरार होण्याची वेळ आली. पोलिसांचे पथक त्याच्या शोधासाठी घरी गेले होते. त्यावेळी तो सापडला नव्हता. अखेर त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Tagged