राजकीय वर्तुळात खळबळ
मुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना पक्षाचे तब्बल २० हून अधिक आमदार नॉट रिचेबल आहेत. विधानपरिषद निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर सोमवारी सायंकाळपासून शिवसेनेचे नाराज आमदार गायब आहेत. पक्षाकडून त्यांना संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र अजूनही हे आमदार मुंबईतील कोणत्याही शिवसेना नेत्याच्या संपर्कात नसल्याचं सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे आज दुपारी गुजरातमधून पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे नाराज आमदार सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. हॉटेलबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बॅरिकेडिंग उभारण्यात आलं आहे. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची भेट घेतल्याचं समजतं. शिंदे आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यामध्ये मतभेद असल्याची चर्चा काही दिवसांपासून होती. आता त्यावर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.