शिवसेनेत भूकंप, 11 आमदार घेऊन एकनाथ शिंदे गुजरातला

देश विदेश न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र राजकारण

मुंबई– राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. भाजपाचे पाचही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं. असं असूनही भाजपाने विजय खेचून आणला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीला हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीचे अनेक आमदार फुटल्याची माहिती देखील समोर येत आहे.


शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे एकनाथ शिंदे हे सोमवारी रात्रीच गुजरातमध्ये दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे आणि 11 आमदार हे सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या हॉटेलबाहेरील बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि गुजरात भाजपचा एक मोठा नेता यांच्यात रात्री उशिरा बैठक झाली.या बैठकीनंतर हा भाजप नेता अहमदाबादच्या दिशेने रवाना झाला असल्याची माहिती समोर आली आहे.  ही बैठक गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्यासोबत ही भेट झाली असल्याची चर्चा जोर पकडू लागली आहे.  
विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे.  शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे 13 आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली होती. मध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत 13 आमदार अनुपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेच्या गोटातील चिंता आणखी वाढली आहे. 
मध्यरात्री वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर शिवसेना आमदारांची आज पुन्हा बैठक बोलवण्यात आली आहे.  आज दुपारी 12 वाजता ही बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत किती आमदार उपस्थित राहतात यावर महाविकास आघाडीचं भविष्य अवलंबून आहे. शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. 
संजय रायमुलकर, संजय राठोड, संजय गायकवाड, शहाजी पाटील, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, उदयसिंह राजपूत, महेश शिंदे यांच्यासह इतर आमदार नॉट रीचेबल आहेत. ते सर्वजण कुठे आहेत, याचा शोध घेण्यात येत आहे.

Tagged