३० हजारांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंत्यास पकडले

बीड

एसीबीच्या बीड पथकाची कारवाई

अंबाजोगाई : केलेल्या विकासकामाची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई अंबाजोगाईत कार्यालयातच बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास केली.संजयकुमार कोकणे असे लाच घेताना पकडलेल्या कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी कार्यरत आहेत. त्यांनी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत निधीतून केलेल्या कामांची प्रलंबित देयके करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भगवान केदार यांच्याकडे मागितली होती. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने सापळा रचून बीडच्या पथकाने लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईने अंबाजोगाई शहरात खळबळ उडाली होती. दरम्यान, पदभार स्वीकारताच त्यांनी कार्यालयात गुत्तेदार पिस्तुलचा धाक दाखवून बिलांवर सह्या घेतात, अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या प्रकरणानंतर कंत्राटदारांची अडवणूक करणे, अरेरावीची भाषा करणे असे प्रकार समोर आले होते. अशा प्रकारे कोकणे यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे.

Tagged