अचानक हेडलाईट बंद पडल्याने स्कार्पिओ विहिरीत कोसळली

महाराष्ट्र

आष्टी: तालुक्यातील अमरापूर-बारामती राज्य महामार्गावर देविनिमगावजवळील रस्त्यावर शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात एक स्पॉर्पिओ गाडी विहीरीत कोसळली आहे. सुदैवाने गाडीतील तीन प्रवासी बचावले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. करन राजू पवार,नितीन अशोक गुंड,बालू शहादेव गुंड (रा.वाघळूज ता.आष्टी) अशी जखमींची नावे आहेत. आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील तीनजण जालना येथे विवाह समारंभासाठी गेले होते. समारंभ आटोपून गावाकडे परतत असताना गाडी देविनिमगावजवळ येताच गाडीची हेडलाईट अचानक बंद झाली. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या पन्नास फूट खोल विहिरीत कोसळली. गाडी विहिरीत कोसळताच तिघेही विहिरीच्या पायऱ्या चढून वर आले. त्याचवेळी देवीनिमगाव येथील शिक्षक सचिन मार्कंडे व महाराज फाळके गावाकडे जात असताना त्यांनी अपघातातील जखमींना मदत केली. कडा येथील डॉ.महेंद्र पटवा यांच्या रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged