माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींचे बोगस टिईटी प्रमाणपत्र रद्द

न्यूज ऑफ द डे राजकारण

औरंगाबाद : दैनिक कार्यारंभ ने उघडकीस आणलेल्या आरोग्य भरती, टिईटी घोटाळा प्रकरणात आज नाव खुलासा समोर आला आहे. राज्याचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींकडे असलेली टिईटीची बोगस प्रमाणपत्रे राज्याच्या शिक्षण परिषदेकडून रद्द करण्यात आली आहेत. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी या परीक्षार्थींची नावे आहेत. त्यातील एक मुलगी सत्तार यांच्याच शैक्षणिक संस्थेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. अब्दुल सत्तार यांचे नाव या घोटाळ्याशी जोडले जाऊ लागल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

आरोग्य सेवक भरती प्रकरणचा पुणे पोलिसांकडून तपास सुरू असतानाच दुसरीकडे टीईटी परीक्षेत देखील घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. हा घोटाळा परीक्षा घेणारे खासगी कंपन्यांचे संचालक, परीक्षा देणारे विद्यार्थी आणि परीक्षा परिषदेचे अधिकारी यांच्या संगनमताने झाल्याचे समोर आल्यानंतर यातील काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. तसेच जे परीक्षा देणारे विद्यार्थी या प्रकरणात दोषी आढळले आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. परीक्षेत गैरप्रकार केलेल्या संबंधित उमेदवारांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे.परीक्षा परिषदेकडून गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये तब्बल 7 हजार 880 विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे. परीक्षा परिषदेकडून गैरव्यवहार प्रकरणात विद्यार्थ्यांच्या नावाची जी यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये सिल्लोडचे आमदार माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींच्या नावाचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

घोटाळ्याचा आणखी तपास होण्याची गरज आहे. मंत्रीच जर आपल्या मुलींच्या नावाने बोगस प्रमाणपत्र मिळवत असतील तर हे प्रकरण किती खोल पर्यंत आहे हे लक्षात येते.

  • राहुल कवठेकर
    एमपीएससी समन्वय समिती
हिच ती दोन नावे…..
Tagged