कारची काळी काच पाहून पाठलाग;आढळला गुटखा!

केज क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


-कारसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त;एकावर गुन्हा – मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांची कारवाई


बीड
दि.12 : काळी फ्लिम असलेली स्विफ्ट कार कारवाईसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने कार सुसाट वेगाने पळवली. त्यामुळे संशयास्पद वाटल्याने मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांनी कारचा पाठलाग केला. कार पकडल्यानंतर कारमध्ये पाहिले असता गुटखा आढळून आला. या प्रकरणी सदरील कार नेकनूर पोलीसांच्या स्वाधीन करत अन्न प्रशासन अधिकार्‍यांच्या फिर्यादीवरुन नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, नेकनूर ठाणे हद्दीमध्ये उप प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांना शनिवारी (दि.12) दुपारी पूर्ण काळ्या फ्लिम असलेली एक स्विफ्ट कार (एमएच-05,सीए-3295) भरधाव वेगात जात असल्याची दिसून आली. काळी फ्लिम असल्यामुळे त्यांनी कारवाईसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतू कार चालकाने कार पळवली. संशय वाढल्याने गणेश विघ्ने यांनी कारचा पाठलाग केला. काही अंतर पाठलाग केल्यानंतर ही कार आडवली. यावेळी कार चालकाचे नाव विचारले असता अशोक गोरख गिरी (वय 20, रा.मंजेरी ता.पाटोदा) असल्याचे सांगितले. त्यानंतर कारची झडती घेतली असता त्यामध्ये गुटखा आढळून आला. गणेश विघ्ने यांनी सदरील कार नेकनूर पोलीसांच्या स्वाधीन केली. गुटखा व कार असा तीन लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करत अशोक गिरी यास पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर अन्न प्रशासन विभागातील अधिकार्‍याच्या फिर्यादीवरुन नेकनूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र गुटखा बंदी कायद्यान्वेय गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास नेकनूर पोलीस करत आहेत. ही कारवाई उप प्रादेशिक परिवहन विभागाचे परिवहन अधिकारी स्वप्निल माने यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने, सहायक मोटार वाहन निरीक्षक राहुल राठोड, चालक नितीन वक्ते यांनी केली.

आरटीओची गुटख्यावरील
पहिलीच कारवाई असावी

जिल्ह्यात गुटख्याची विक्री व वाहतूक सर्रासपणे होत असल्याचे वारंवार होणार्‍या कारवाया वरुन दिसून येते. मात्र झोपेचे सोंग घेतलेल्या अन्न प्रशासनाला गुटखा दिसत नाही. आरटीओ विभागाकडून गुटख्यावर कारवाई केल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असावी.

कारला 31 हजारांचा दंड
या प्रकरणी माल वाहतूक करण्याचा परवाना असताना राज्यात बंदी असलेला गुटखा वाहतूक केला. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार या वाहनावर उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने 31 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

Tagged