राज्यस्तरीय खटोड कीर्तन महोत्सवात आईला स्टेजवर जागा पण घरात नाही

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


गौतम खटोड यांची आई, भाऊ, पुतण्याला हिन वागणूक; पत्रकार परिषदेत आईने मांडल्या व्यथा

बीडदि.9 ः दोन दशकापासून बीडमध्ये राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव घेणारे स्व.झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठाण आहे. या प्रतिष्ठाणच्या माध्यमातून समाजाला नियतीचे डोस पाजणारे गौतम खटोड मात्र घरात कुटूंबीयांना हिन वागणूक देत आहेत. रात्रीच्या बारा वाजता आईला घराच्या बाहेर काढत आहेत. भावाला, पुतण्याला नाहक त्रास देत असल्याच्या व्यथा कुटूंबीयांनी पत्रकारांसमोर मांडल्या. बुधवारी (दि.9) खटोड इंडस्ट्रीज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी गौतम खटोड यांच्या आई निर्मला खटोड, भाऊ सुशील खटोड, पुतण्या अशिष खटोड यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना सुशील खटोड म्हणाले की, धार्मिक व सामाजिक कार्य करताना आम्ही सोबत असतोत. परंतू गौतमने आम्हाला कोठेही पुढे येऊ दिले नाही. तसेच मी चौथी पास आहे. माझ्या अडाणीपणाचा फायदा घेऊन आणि आम्हाला अंधारात ठेवून प्रॉपर्टी मुलाच्या आणि स्वत:च्या नावे करून घेतली. मागील तीन वर्षांपासून माझ्यासह कुटूंबावर अन्याय होत आहे. परंतू बदनामीपोटी शांत होतो. परंतू आता हे असह्य झाले असून आता माझ्यापुढे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. गौतमचा मुलगा माझी आई निर्मला यांना धक्काबुक्की करतो. गौतम बाहेर सामाजिक कार्याचा आव आणतो. परंतू प्रत्यक्षात घरात कोणालाच व्यवस्थित वागवत नाही. सासरकडील नातेवाईकांच्या जीवावर धमक्या देतो, असा आरोपही खटोड यांनी केला आहे. परंतू केवळ बदनामीपोटी आपण पोलिसांत तक्रार दिली नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मंगळवारी सायंकाळी खटोड यांच्या एमआयडीसी भागातील घराच्या बाहेरच सुशिल खटोड आणि पुतण्या शुभम गौतम खटोड यांच्यात वाद झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यांचे भांडण घरातील महिला सदस्य सोडवत आहेत. परंतू या प्रकरणात आपण तक्रार दिली नसल्याचेही त्यांनी सांगितले. पण याबाबत सर्वांची विचार करून तक्रार करणार असल्याचे सुशिल खटोड म्हणाले.

बदनामीला मी घाबरत
नाही- गौतम खटोड

पत्रकार परिषदेनंतर गौतम खटोड यांनीही पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी आतापर्यंत त्याला खुप सांभाळून घेतलेले आहे. परंतू त्याच्यात सुधारणाच होत नाही. प्रॉपर्टी तो अर्धी मागत असेल पण मी 51 टक्के द्यायला तयार आहे. त्याने केलेले आरोप खोटे असून माझ्यावर खुप बदनामीचे घाव झालेले आहेत. मी या गोष्टीला घाबरत नसल्याचेही गौतम खटोड म्हणाले. विशेष म्हणजे सुशील खटोडांच्या पत्रकार परिषदेचे निमंत्रण, विरोधात आलेल्या बातम्या स्वतः गौतम खटोड दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल करत होते. त्यामुळे नेमका काय प्रकार सुरु आहे, हे कुणाच्याच लक्षात येत नव्हते.

Tagged