भाजपा आमदारांच्या सभेत गोंधळ!

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.14 ः गेवराई तालुक्यातील रुई या गावात आ.लक्ष्मण पवार यांची सभा सुरु असताना सभेत मोठा गोंधळ झाला. घटनेची माहिती मिळताच गेवराई उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांच्यासह गेवराई पोलीसांनी रुई येथे धाव घेतली. जिल्हाभरात ग्रामपंचायत निवडणुका शांततेत सुरु असताना गोंधळ, गडबड झाल्याची पाहिलीच घटना गेवराई तालुक्यात समोर आली आहे. मात्र या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत पोलीसात कुठलीही नोंद नव्हती.

सध्या जिल्हाभरात ग्रामपंचायत निवडणुकीचे घमासान सुरु आहे. गावागावात बैठका, सभा, प्रचार फेर्‍या काढल्या जात आहे. तर आपल्या ताब्यात अधिकाधिक ग्रामपंचायत येण्यासाठी लोकप्रतिनिधींचीही धडपड सुरु आहे. रुई येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवारी (दि.14) रात्री सभेचे आयोजन केले होते. येथे प्रचारासाठी स्वतः भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांच्यासह त्यांचे पदाधिकारी, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पदाधिकार्‍याने विरोधकांबद्दल थेट आरोप केल्याने विरोधी गटाने गोंधळ घातला. आमदारांच्या सभेत गोंधळ झाल्यामुळे उपअधीक्षक स्वप्निल राठोड यांच्यासह गेवराई पोलीसांना रुईत जावे लागले. परंतू दोन्ही गटांनी सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे प्रकरण मिटले. मात्र रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी पोलीसात नोंद नव्हती. पोलीसांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.

Tagged