भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ अडचणीत

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

शिरूर कासार न्यायालयाचे समन्स जारी; महेबूब शेख यांची बदनामी करणे भोवले

शुभम खाडे
प्रतिनिधी। बीड
दि.15 : आक्रमक महिला नेत्या म्हणून ओळख असलेल्या भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या अडचणीत सापडल्या आहेत. त्या शिरूर कासार येथे दौर्‍यावर आल्या असता, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या प्रकरणात शिरूर कासार न्यायालयाने दि.9 डिसेंबर 2022 रोजी समन्स जारी केले आहे. त्यामुळे त्यांना आता शिरूर कासार न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.

चित्रा वाघ ह्या तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पवार यांच्या शिरूर कासार येथील निवासस्थानी दि.18 जुलै 2021 रोजी दौर्‍यावर असताना आल्या होत्या. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांना संबोधित करताना वाघ यांनी महेबूब शेख यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केले होते. त्याचे व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर श्री.शेख यांनी दि.2 ऑगस्ट 2021 रोजी शिरूर कासार पोलीस ठाण्यात वाघ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यामुळे श्री.शेख यांनी शिरूर कासार येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी झाली असता न्यायालयाने शिरूर कासार पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी सादर केलेला चौकशी अहवाल न्यायालयाने प्रथमदर्शनी तत्थ दिसून येत असल्याने स्वीकारला. सुनावणीदरम्यान श्री.शेख यांचा शपथेवर जवाब नोंदविला असून, प्रथम वर्ग न्यायाधीश ए.टी. मनगिरे यांनी दि.9 डिसेंबर 2022 रोजी चित्रा वाघ यांच्याविरोधात भादंवी 500, 499 अन्वये समन्स जारी केले आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना आता शिरूर कासार येथील न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. दरम्यान, महेबूब शेख यांच्यावतीने माजी जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.सय्यद अझर अली यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड.के.के. कांबळे यांनी सहकार्य केले.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केला तर काय परिणाम होतात, हे चित्रा वाघ यांना आता लक्षात येईल. स्वतः न्यायाधीश असल्यासारखे एखाद्याला आरोपी ठरवून बेताल वक्तव्य करताना यापुढे विचार करावा लागेल. स्वतःला न्यायाधीश समजण्याच्या नादात इतरांची बदनामी करतात आणि आपणच खुप शहाणे आहोत असे समजतात; अशा लोकांच्या विरोधात हे माझ्या न्यायालयीन लढाईचे पहिले पाऊल आहे. आज न्यायालयाने यात दखल घेतली आहे. बेताल वक्तव्य करणार्यांचा कायदेशीर बंदोबस्त करण्यासाठी ही लढाई शेवटपर्यंत लढली जाईल.
-महेबूब शेख, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

अब्रुनुकसानीचा 50 लाखांचा दावा
शिरूर कासार येथील बदनामीकारक वक्तव्य प्रकरणात अब्रुनुकसानीपोटी 50 लाख रूपयांची भरपाई देण्याचा दावा महेबूब शेख यांनी केला आहे. याप्रकरणात चित्रा वाघ यांनी सदरील दावा फेटाळण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. त्याठिकाणी सदरील प्रकरण प्रलंबित आहे.

Tagged