DEVENDRA FADNAVIS BEED

‘ज्योतीताईंना आमदार करा’, शिवसंग्रामची मागणी फडणवीस म्हणाले, ‘तुमचे स्वप्नं पुर्ण करण्यासाठी ताकदीने पाठीशी उभे राहू’

न्यूज ऑफ द डे बीड

प्रतिनिधी । बीड
दि.31 : स्व.विनायकराव मेटे यांच्या पश्चात पहिल्यांदाच त्यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावली. यावेळी विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योतीताई मेटे यांना आमदार करून सत्तेत सहभागी करा, अशी मागणी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केली. त्यांच्या या मागणीची दखल फडणवीस यांनी घेत, स्व.विनायकराव मेटे यांनी पाहीलेलं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आम्ही संपूर्ण ताकदीने शिवसंग्रामच्या पाठीशी उभे राहू. तुमचे सगळे संकल्प पूर्ण करू, अशी ग्वाही दिली. त्यामुळे येणार्‍या काळात भाजपाकडून ज्योतीताई मेटे यांना विधान परिषदेवर संधी मिळणार असल्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

स्व. विनायकराव मेटे यांनी बीडमध्ये 2015 पासून व्यसनमुक्ती कार्यक्रम आयोजित केला होता. यावर्षी प्रथमच त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी ज्योतीताई मेटे यांनी व्यसनमुक्ती जनजागृती रॅली काढली. या रॅलीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री अतुल सावे यांनी उपस्थिती लावली.

कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, स्व.मेटेंनी त्यांच्या हयात विविधी सामाजिक उपक्रम राबविले. 24 तास त्यांच्या डोक्यात सामाजिक काम असायचे. त्याचाच भाग म्हणून व्यसनमुक्तीचा हा कार्यक्रम होत आहे. 31 डिसेंबरला हल्ली वेगळं स्वरूप आले आहे. तरूण मुलं या दिवशी व्यसनाच्या आहारी जातात. त्यामुळे युवापिढीवर मोठा परिणाम होत आहे. आज मी त्या तरूणांना सांगू इच्छितो की तुम्ही व्यसन नाही केलं तर तुम्हाला माझ्यासारखं मुख्यमंत्री होता येतं. आपले शत्रू राष्ट्र नेहमीच भारतात या ना त्या मार्गाने अंमली पदार्थ पाठवतात. आपली युवा पिढी व्यसनी व्हावी, त्यांना सुखासिनतेमध्ये अडकवले तर त्या देशाला लवकर उध्दवस्त करता येते असा त्यांचा समज असतो. परंतु आज तरूणांना सांगू इच्छितो की एकवेळी देवळात नाही गेलात तरी चालेल, पण सदृढतेसाठी व्यसनापासून दूर रहा. नशेखोरीत अडकलेली तरूणाई दुश्मनांचा कसा मुकाबला करू शकेल? दारूने संसार उध्दवस्त होतात. त्यामुळे आज तुम्ही शपथ घ्या की मी कधीही आयुष्यात व्यसन करणार नाही, असे म्हणत फडणवीसांनी उपस्थितांना व्यसनमुक्त होण्याची शपथ दिली. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आ.सुरेश धस, आ.लक्ष्मण पवार, भीमराव धोंडे, रमेश आडसकर, अक्षय मुंदडा, कुंडलीक खांडे, तानाजी शिंदे, राजन घाग, रामहारी मेटे, प्रभाकर कोलंगडे, सीए बी.बी. जाधव, आशुतोष मेटे, अनिल घुमरे, सुहास पाटील, मनोज जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्र संचलन ज्ञानदेव काशीद यांनी केले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

तुमचा संकल्प पूर्ण करू – चंद्रशेखर बावनकुळे
शिवसंग्रामने नेहमीच भाजपला साथ दिली आहे. स्व.विनायकराव मेटे आमचे मार्गदर्शक होते. त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खूप मोठं काम केलं आहे. आमच्या सरकारने मराठा समाजाला ते आरक्षण बहाल देखील केलं होतं. परंतु मधल्या काळात आलेल्या महाविकास आघाडी सरकारमुळे हे आरक्षण टिकू शकले नाही. शिवसंग्रामने जी काही स्वप्नं पाहीली आहेत त्या स्वप्नांच्या पुर्तता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की करतील, असा मला विश्वास वाटत असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. त्यांच्या या म्हणण्यामागे प्रदेशाध्यक्ष तानाजी सावंत यांनी ज्योतीताई मेटेंना आमदार करण्याची केलेली मागणी हा संदर्भ होता.

साहेबांचा पिंड समाजकारणाचा होता- ज्योतीताई मेटे
विनायकराव मेटे साहेबांचा पिंडच हा समाजकारणाचा होता. ज्या गोष्ट समाजाला आपण सांगतो ती गोष्टी आपण आधी करायला हवी, यासाठी त्यांनी बीड जिल्ह्यात पहिल्यांदा घेतलेल्या सामुदायिक मेळाव्याचे उदाहरण दिले. शिवाय या मेळाव्यात आमचे देखील लग्न झाल्याचे त्यांनी नमूद केले. शिरूर तालुक्यात देशात सर्वात कमी मुली आढळून आल्यानंतर मेटे साहेबांनी तिथे मुलींसाठी अजित बालिका सुरक्षा योजना सुरु केली. त्यानंतर त्यांनी तरूणांनी व्यसनमुक्त राहण्यासाठी प्रयत्न केले. साहेबांचा हाच वसा पुढे चालू ठेवण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला. फडणवीस साहेबांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यामुळे निश्चितच आम्हाला पाठबळ मिळाल्याचे ज्योतीताई मेटे यांनी नमूद केले.
———-