AJIT PAWAR

2014, 2017, 2019 चे सगळे सिक्रेट अजित पवारांनी AJIT PAWAR ओपन केले

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र राजकारण

मुंबई, दि.5 : राष्ट्रवादी काँग्रेसने एकदा नव्हे तर तीन वेळा भाजपसोबत जाण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार AJIT PAWAR यांनी केला. 2014 मध्ये भाजपला बाहेरून पाठींबा कसा दिला? 2017 ला सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला अन् तो पुन्हा का माघारी घेतला? 2019 मध्ये ज्या काही राजकीय उलथा पालथी झाल्या त्यात राष्ट्रवादीने कशा प्रकारे धरसोड वृत्ती अवलंबून मला वेळोवेळी तोंडावर पाडलं? असे एक ना अनेक गौप्यस्फोट आज अजित पवार यांनी केले. त्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

आज आम्ही भाजपसोबत गेलो तर तुम्हाला सहन होत नाहीये. पण मग या आधी कितीदा तरी तुम्ही भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न केला होता. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्ही सिल्व्हर ओकला होतो. त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आपण बाहेरून भाजपला पाठिंबा देऊ. आम्ही शांत बसलो. कारण नेत्याचा निर्णय होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आम्हाला सांगितलं वानखेडेला शपथविधीच्या कार्यक्रमाला हजर राहा. आम्ही गेलो. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटले. त्यांनी आमची विचारपूस केली. भाजपसोबत जायचं नव्हतं तर आम्हाला तिकडे का पाठवलं? पुन्हा 2017 ला वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. सुनील तटकरे, मी, जयंत पाटील होते. सुधीर मुनगंटीवार, फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत तावडे देखील तिथे होते. कोणती खाती, कोणती पालकमंत्रीपदं याचं सगळं काही वाटप ठरलं. त्यावेळी भाजपच्या वरीष्ठांनी सांगितलं होतं की शिवसेना हा आमचा 25 वर्षापासूनचा मित्रपक्ष आहे. आम्ही त्यांना सोडणार नाही. त्यांच्यासोबत तुम्हीही सरकारमध्ये या. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार राहील. आमचे वरिष्ठ नेते म्हणाले. ते चालणार नाही. शिवसेना जातीयवादी आहे. त्यानंतर बोलणी फिस्कटली, असा गौप्यस्फोट देखील अजित पवारांनी केला.

त्यानंतर 2019 च्या निवडणुकीनंतर एका उद्योगपतीच्या घरी एक चर्चा झाली. पाच बैठका झाल्या. मला आणि देवेंद्रला सांगितलं कुठे बोलायचं नाही. नेत्यांनी सांगितलं म्हणून मी कुठे बोललो ना्ही. त्यानंतर अचानक बदल झाला. आम्हाला निरोप आला आपल्याला शिवसेनेसोबत जायचं आहे. म्हणजे 2017 ला शिवसेना जातीयवादी होता. त्यानंतर अचानक काय झालं की शिवसेना जातीयवादी राहिला नाही. अन् भाजप जातीयवादी झाला. असं चालत नाही, असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं. मला उपमुख्यमंत्री केलं. मी कधी हूँ की चूँ केलं नाही. कोरोना काळात काम केलं. त्यात हलगर्जीपणा केला नाही. त्यानंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. आम्ही आमच्या प्रमुखांना सांगितलं काही तरी वेगळं घडतंय. उद्धव ठाकरेंना सांगितलं काही तरी घडतंय. पण कुणी लक्ष दिलं नाही. एकनाथ शिंदे यांनी वेगळा निर्णय घेतला. ते गुवाहाटीला गेले. त्यावेळी आम्ही 51 आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवला. सगळ्यांची विमानाची तिकिटं काढून ठेवली. एक खासगी विमान तयार ठेवलं. पण वरिष्ठांनी काहीच निर्णय घेतला नाही, असंही अजित पवार म्हणाले.

महाविकास आघाडीच्या काळातही भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हावं, असं पत्र राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिलं होतं, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेलांनी केला होता. त्यावर बोलताना अजित पवारांनी सांगितलं की, “मी उपमुख्यमंत्री असताना, माझ्याच केबीनमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी एक पत्र ड्राफ्ट केलं. हसन मुश्रीफ साहेबांनी 53 विधानसभेचे आमदार आणि इतर परिषदेच्या आमदारांनी त्यावर सह्या केल्या होत्या. तेव्हा आपापली कामं व्हायची असतील तर सत्तेत सहभागी व्हावं, अशी विनंती सर्व आमदारांनी केली होती.

एकूणच अजित पवार यांनी आज आपल्या रोखठोक शैलीत सगळी गुपीतं उघड केली. ज्या गोष्टींवर इतक्या दिवसांपासून पडदा पडलेला होता त्या गोष्टींवरच पडदा उघडण्याचं काम आज अजित पवारांनी केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Tagged