मुंबई, दि.5 : मला लोकांच्या समोर व्हिलन का केलं जातं कळत नाही? काय माझी चूक आहे? या सगळ्या गोष्टी होत आहेत पण शरद पवार SHARAD PAWAR हे माझं दैवत आहेत. पण तुम्हीच मला सांगा एखादा माणूस महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरीमध्ये लागला तर 58 व्या वर्षी रिटायर्ड होतो. आयएएस, आयपीएस असेल तर 60 व्या वर्षी रिटायर्ड होतात. राजकारणात असेल तर भाजपात 75 व्या वर्षी रिटायर्ड केलं जातं. मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण आडवाणी ही उदाहरणं आहेत असं अजित पवार AJIT PAWAR यांनी म्हटलं आहे. पण साहेबांचं वय 83 झालं… मी सुप्रीयाला म्हटलं त्यांना थांबव… तर सुप्रीया म्हणाली ते खूप हट्टी आहेत ते कोणाचं ऐकत नाहीत. असा कसला हट्ट? असे म्हणत अजित पवारांनी काकांना थांबण्याचा सल्ला देत चांगलेच खडसावले आहे.
अजित पवार म्हणाले, आता नवी पिढी पुढे येते आहे. तुम्ही आशीर्वाद द्या ना.. चुकलं तर सांगा की अजित तुझं हे चुकलं. चूक मान्य करुन दुरुस्त करुन पुढे जाऊ. पण हे कुणासाठी चाललं आहे? आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? मित्रांनो आज आपले वरिष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेले होते. यशवंतराव हे आपलं दैवतच आहेत. माझ्याकडूनही चूक झाली होती तेव्हा मी एक दिवस आत्मक्लेश केला होता. मला माझंच वागणं मनाला लागलं होतं. आता जर वय जास्त झालं 82 झालं, 83 झालं तर तुम्ही कधी थांबणार आहात का? वयाच्या बाबतीत तर आम्हाला वाटतं की तुम्ही शतायुषी व्हावं.
मला हे सांगण्यात आलं की मी राजीनामा देतो, संस्था बघतो. त्यानंतर एक कमिटी करतो, त्या कमिटीत तुम्ही सगळे प्रमुख बसा. ते बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा सांगितलं त्यालाही आम्ही तयार झालो. त्यानंतर दोन दिवसांत काय घडलं कुणास ठाऊक? त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? मला महाराष्ट्राने सांगावं की आमच्यात धमक आहे की नाही? जे प्रमुख नेते म्हणून पाहिले जातात त्यात माझं नाव शेवटी का होईना येतं ना? मग मला का आशीर्वाद का दिला जात नाही. शेतकरीही 60 वर्षांचा झाला की 25 वर्षांच्या मुलाला सांगितलं जातं आता शेती तू बघायची आणि आम्ही तुला सल्ला देऊ.
मी सुप्रियाशीही बोललो, सुप्रिया आपण एका घरातले, एका कुटुंबातले आहोत काहीतरी सांग. त्यावर सुप्रिया म्हणाली ते हट्टी आहेत. हा नेमका कसला हट्ट आहे? शरद पवारांविषयी आम्हाला खूप आदर आहे. आत्ता सांगितलं की काही काही आमदारांना बोलवलं जातं. ते भेटले नाही तर त्यांच्या पत्नींना फोन केला जातो भावनिक केलं जातं. मी नाव घेत नाही वरिष्ठ नेत्याने एका आमदाराला सांगितलं की का तिकडे जातो. त्याने हात जोडून सांगितलं आम्ही दादांना शब्द दिला आहे.
अनेकदा हे सगळे आमदार म्हणायचे काहीतरी करा, 2019 चं आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही आता काही पावलं उचलली तर आम्ही तुम्हाला साथ देऊ. आज नरेंद्र मोदींचा करीश्मा देशात आहे. 2014 च्या निवडणुकीत एकट्या नरेंद्र मोदींकडे पाहून कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भाजपा सत्तेवर आला आहे. 2019 ला पुन्हा त्यांना निर्विवाद बहुमत मिळालं असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
आज राष्ट्रवादीवर आणि आपल्यावर ही वेळ का आली? मी देखील साहेबांच्याच छत्रछायेखाली मी तयार झालो आहे. 1978 ला आपल्या वरिष्ठ नेत्यांनी वसंतदादा पाटील यांचं सरकार स्थापन करुन पुलोदचं सरकार आणलं. त्यावेळी शरद पवार हे 38 वर्षांचे होते. तेव्हापासून साहेबांचं राजकारण महाराष्ट्र बघत होते. पुलोदच्या सरकारमध्ये जनसंघही होता, जो आत्ताचा भाजपा आहे.
मी फार मागे जाणार नाही. आपल्या नेत्यांनी सुरुवात 1962 मध्ये केली. त्यानंतरचा काळ काही लोक जन्मालाही आले नव्हते. मात्र काळ सरकत होता. 1967 ला बारामतीकरांनी निवडून दिलं. 1972 ला राज्यमंत्री झाले. 1975 ला मंत्री झाले. 1978 ला एक प्रसंग आला आणि वसंतदादा पाटील सरकार स्थापन केला. 38 व्या वर्षी साहेब (शरद पवार) मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून हा महाराष्ट्र त्यांना साथ देतो आहे. आम्ही राजकीय जीवनात आलो आपण सगळ्यांनी साथ दिली.
1978 चा काळ गेला आणि 1980 चा काळ आला. 80 च्या दशकात पुन्हा इंदिरा गांधी यांची लाट आली होती. पुलोदमध्ये जनसंघही सामील होता, जो आत्ता भाजपा आहे. उत्तमराव पाटील, हशू पटेल हे त्या मंत्रिमंडळात होते. 1980 ला ते सरकार गेलं. त्यावेळी इंदिराजींनी सांगितलं होतं सगळे काँग्रेसमध्ये आलात तर सरकार ठेवते. मात्र ते झालं नाही, त्यामुळे 1980 ला सरकार गेलं आणि निवडणूक झाली. इंदिराजी निवडून आल्या. इंदिराजी पंतप्रधान झाल्या. इतिहास जर पाहिला तर तुमच्या माझ्या देशाला करीश्मा असणारं नेतृत्व लागतं.
1977 ला देशपातळीवर असणारा जनता पक्ष आत्ता कुठे आहे? तो पक्ष शोधावा लागतोय का? कारण करीश्मा असणारा नेता त्या पक्षाला नव्हता. त्यानंतरच्या काळात 1985 ला पुन्हा समांतर काँग्रेस, समाजवादी काँग्रेस असे पक्ष साहेबांनी काढले. त्यावेळीही त्यांना साथ दिली गेली. 1985 ला आपण विरोधी पक्षांत गेलो. प्रत्येकाचा काळ असतो हे लक्षात घ्या. आपण साधारण वयाच्या 25 ते 75 या काळात आपण उत्तम काम करु शकतो. समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द असते.
हे सगळं घडत असताना काय झालं मला माहित नाही. पण जनतेला आणि कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं 1986 ला समाजवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन झाली. त्यानंतर दोन वर्षे नेत्यांना पद मिळालं नाही. 1988 ला राजीव गांधी पंतप्रधान असताना मुख्यमंत्रीपद दिलं. 1990 ला पुन्हा निवडणुका झाल्या बहुमत आलं नाही. 1991 ला राजकारण दिलं. मला लोकसभेवर जाता आलं, प्रफुल्ल पटेलांना लोकसभेवर जाता आलं. त्यावेळी एका घटनेत राजीवजी निघून गेले. मग एक लाट आली आणि नरसिंहराव पंतप्रधान झाले. मग साहेब संरक्षण मंत्री म्हणून गेले. सुधाकरराव नाईक यांना जबाबदारी दिली. मग 1993 ला बॉम्बस्फोट झाले तेव्हा नरसिंह राव यांनी पुन्हा साहेबांना महाराष्ट्रात पाठवलं. 1995 ला शिवसेना भाजपा युती आली. मनोहर जोशी नारायण राणे मुख्यमंत्री होते तो काळही आपण पाहिला असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
1999 ला आपल्याला सांगण्यात आलं सोनिया गांधी परदेशी आहेत. परदेशी व्यक्ती देशाच्या पंतप्रधान होऊ शकत नाही. 1999 ला भुजबळांनी पुढाकार घेतला आणि तुम्ही साथ दिली. चार महिन्यांनी निवडणुका लागल्या त्यावेळी मैदान गाजवण्याचं काम छगन भुजबळ यांनी केलं. हा इतिहास तुम्हाला आठवत असेल. त्यानंतरच्या काळात मी, आर. आर. पाटील, सुनील तटकरे, जयंत पाटील सगळे तरुण होतो. आमचीही काही स्वप्नं होती. आम्हाला महाराष्ट्र आपल्या परिने घडवायचा होता. विलासरावांच्या मंत्रिमंडळातही आपण जिवाचं रान करुन काम केलं. त्यावेळी मला कृष्णा खोर्याचं खात दिलं गेलं ती जबाबदारी आम्ही घेली. प्रशासनावर माझी पकड आहे की नाही हे महाराष्ट्राला माहिती आहे. मी जातीपातीचं राजकारण केलं नाही. कुणीही कार्यकर्ता आला की त्याचं काम करुन देण्याची भूमिका घेतली. हे सगळं राज्य पुढे जाण्यासाठीच करतो आहे.
देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख झाली पाहिजे. हे माझं स्वप्न आहे. 2004 ला आपले 71 आमदार आले आणि काँग्रेसचे 69 आमदार आले. त्यावेळी मला पक्षात फार महत्त्वाचं स्थान नव्हतं. त्यावेळी सोनिया गांधी यांनी विलासरावांना हे सांगितलं होतं की राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल. आम्हाला विलासरावांनी विचारलं की तुमच्यात मुख्यमंत्री कोण होईल? त्यावेळी छगन भुजबळ, आर. आर. पाटील यांची नावं चर्चेत होती. पण आलेली संधी तेव्हा आपण चार खाती जास्त घेतली आणि आपण मुख्यमंत्री पद घेतलं नाही. ती संधी मिळाली असती तर ठामपणे सांगतो आजपर्यंत तुम्हाला राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री दिसला असता असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
आम्ही वडिलधार्यांचा आदर करतो आहोत. आम्हालाही कळतं निवडून आल्यावर जनतेची हीच अपेक्षा असते की आमच्या आमदारांनी विकास करावा, तशाच पद्धतीने आम्ही काम करत आलो आहोत. सगळ्यांच्या साथीने उद्याला आपल्याला पुढे जायचं आहे.
71 वरुन आपण खाली आलो. त्यावेळी अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. तेव्हा काँग्रेसच्या जागा जास्त आल्या होत्या. त्यानंतर सरकार आलं. 2004 ला खासदारही कमी होते, नंतरही ते चार, आठ, सात यापेक्षा पुढे आपण गेलो नाही हे वास्तव आहे. मला मनापासून वाटत होतं आपला पक्ष वाढला पाहिजे. खासदार, आमदारांची संख्या वाढली पाहिजे. नवे कार्यकर्ते, नव्या महिला कार्यकर्त्या पुढे आल्या पाहिजेत. 25 वर्षांनी नवी पिढी पुढे येते, 50 वर्षांनी दुसरी पिढी येते, 75 वर्षांनी तिसरी पिढी येते. हे चक्र आहे.
2014 मध्ये एकदा भाजपाची सत्ता नसताना भाजपाच्या नेत्यांनी सांगितलं 16 जागा राष्ट्रवादी, 16 शिवसेना आणि 16 भाजपा असा फॉर्म्युला ठरला होता. मात्र भाजपाने काही गोष्टी मागे घेतल्या. 2014 ला भाजपाची सत्ता आली. भाजपाची सत्ता आल्यानंतर राज्यात भाजपाची सत्ता आली. जो समन्वय असला पाहिजे तो झाला नाही. विरोधी पक्षात बसावं लागलं. पण आपण खूप पुढे गेलो नाही. भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे बहुमत प्रचंड आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.