शाळेतच विद्यार्थिनीचा मृत्यू; मृत्यूचे धक्कादायक कारण समोर

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

बीडच्या शिक्षण वर्तुळात खळबळ

बीड : शाळेत चक्कर येऊन पडल्यानंतर नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना बीड शहरात शुक्रवारी दुपारी घडली. ती शारीरिकदृष्ट्या सक्षम होती, परंतु अभ्यासाच्या अतितणावाने हृदयविकार आल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती पालकांनी दिली आहे. त्यामुळे बीडच्या शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शेख रमशा शेख इरफान (१४) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती बीड शहरातील बार्शी नाका परिसरात असलेल्या संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. रमशा ही दोन-तीन दिवसांपासून आजारी होती अशी माहिती कुटुंबियांनी दिली. अभ्यासाचा अतिताण होत असल्याचे ती सातत्याने कुटुंबियांना सांगत होती. शुक्रवारी सकाळी ती शाळेत गेली, मात्र दुपारी १२ वाजेच्या दरम्यान चक्कर येऊन पडली. त्यांनतर तिला एका खाजगी रुग्णलयात त्यानंतर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु तिला मृत घोषित केले. यासंदर्भात वैद्यकीय विभागाकडे अधिकृतपणे नोंद झालेली नाही.

खेळाडू असल्याने शारीरिकदृष्ट्या सक्षम..
शेख रमशा हिचे वडिल इरफान शेख हे पाटोद्याला एका शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे शेख रमशा ही खेळाडू असल्याचे समजते. नववीत असलेली रमशा ही अभ्यासात हुशार होती आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम होती, तरी देखील तिचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

Tagged