31 लाखांचा गुटखा पकडला; महारुद्र मुळेसह तिघांवर गुन्हा!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


बीड दि. 30 : गुटख्याचा टेम्पो शनिवारी (दि.29) रात्रीच्या सुमारास पाली परिसरात अडवला, मात्र पळून जाण्यासाठी चालकाने पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर टेम्पो घालण्याचा प्रयत्न करून भरधाव वेगाने टेम्पो गेवराईच्या दिशेने पळवला, पाडळशिंगी टोलनाक्यावरील पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी सदरील टेम्पो पकडला. त्यामधे 31 लाख रुपयांचा गुटखा, टेम्पो, मोबाईल असा 46 लाख 28 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी चालक सामेनाथ जालिंदर मळेकर (वय 23 रा.मळेकरवाडी ता.पाटोदा), टेम्पो मालक ज्ञानेश्वर भिमराव साळुंके (रा. निगडी पुणे), व गुटखा मालक महारुद्र मुळे (रा. घोडका राजुरी ता.बीड)यांच्यावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


29 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास बीड ते मांजरसुंबा हायवे रोडवर रोहीटे यांचे पेटोलपंपाजवळ रोडवर सामेनाथ जालिंदर मळेकर हा आयशर टेम्पो (एमएच. 14, जेएल 863) यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत माल गोवा कंपनीचा गुटखा साठा आणि विक्री करण्यास प्रतिबंधीत केलेल्या मालासह मिळून आला, त्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस असल्याची ओळख करून दिली, परंतु त्याने जीवे मारण्याचे उद्येशाने टेम्पो पोलीस अंमलादार गणेश नवले यांच्या अंगावर घातला, तसेच पुन्हा दुचाकीवर टेम्पो घालत दुचाकीचे (एमएच.14, एक्यु. 4891) नुकसान केले आणि टेम्पो पळवला. याची माहिती पाडळशिंगी टोलनाक्यावर महामार्ग पोलिसांना दिली, तिथे काकडे, गडदे, परजने यांनी टेम्पो पकडला. सदरील टेम्पो व चालक बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिले. या प्रकरणी गणेश नवले यांच्या फिर्यादीवरून (कार्यारंभ) कलम 307, 353, 328, 272, 273, 188, 427, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोना.गणेश नवले, नामदास, चव्हाण, कानतोडे, थापडे यांनी केली.

Tagged