GEORAI- balasaheb MASKE

कृषी सभापतींकडून कृषी सेवा केंद्राची झाडाझडती

महाराष्ट्र

बीड : येथील जिल्हा परिषद कृषी सभापती सविता बाळासाहेब मस्के यांनी मंगळवारी सकाळी कृषी अधिकार्‍यांना सोबत घेऊन गेवराई शहरातील कृषी सेवा केंद्र दुकानांना अचानकपणे भेट देऊन झाडाझडती घेतली. यावेळी त्यांना दुकानात भावभलक नाही, विक्री बिलात त्रुटी आढळून आलेल्या दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेऊन जिल्ह्यात खतांचा तुडवडा पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दुकानदारांना देतानाच चढ्या भावाने खते विक्री केल्यास खपवून घेणार नसल्याच्या सुचना देखील संबंधितांना दिल्या.

     तालुक्यात मागील चार-पाच दिवसापासून मान्सूनच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत गेवराई तालुक्यातील शेतकरी खरीप पिक पेरणीच्या कामात लगबग करताना दिसत आहेत. कापूस, तुर, सोयाबीन बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी सध्या तालुक्यातील मोंढा भागात असलेल्या बि-बियाणे, खते, औषधे विक्रीच्या दुकानात मोठी गर्दी करत आहेत. यावेळी विक्रेत्यांच्या कृत्रिम खत टंचाईमुळे शेतकर्‍यांना खत उपलब्ध होत नसल्याची तक्रारी तसेच शेतकर्‍यांची बि-बियाणे खरेदी करतेवेळी कृषी दुकानदार लुट तर करत नाहीत ना ? हि खात्री करण्यासाठी बीड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सविता बाळासाहेब मस्के यांनी मंगळवारी सकाळी येथील मोंढा भागातील कृषी दुकानांना अचानक भेटी देऊन दुकानाची झाडाझडती घेतली. यामध्ये स्टाँक रजिस्टरची पाहणी करतानाच काही दुकानात दर्शनी भागात भावफलक नसल्याने आढळून आले, तर काही ठिकाणी विक्री बिल बुकात मोठ्या त्रुटी आढळून आल्याने त्यांना कारणे नोटीसा बजावून सात दिवसाच्या आत खुलासा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सविता मस्के यांनी बि-बियाणे खरेदीसाठी आलेल्या शेतकर्‍यांशी देखील संवाद साधून खरेदी केलेल्या बियांणाची बीले घ्यावीत, कोणी दुकानदार चढ्या भावाने विक्री करत असेल तर याची माहिती कृषी अधिकारी यांना द्यावी, संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी शेतकर्‍यांशी बोलताना सांगितले.

खतांचा तुटवडा पडू देणार नाही -सभापती सविताताई मस्के
कृषी दुकानांची झाडाझडती घेतेवेळी काही कृषी दुकानदारांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे काही खते उपलब्ध होत नसल्याचे सांगितले. यावेळी जिल्ह्यात खतांचा तुटवडा पडू देणार नाही, याबाबत मी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे सभापती सविताताई मस्के यांनी सांगितले. यावेळी गेवराई पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी अनिरुद्ध सानप, कृषी सभापती स्वीय सहायक कुलकर्णी, मोहीम अधिकारी बी.आर.गंडे यांची उपस्थिती होती.

Tagged