बीडची सगळी इत्यंभूत माहिती गोळा करून मुषकांनं फटफटीवर टांग मारीत बीडचं शासकीय रेस्ट हाऊस गाठलं. समोर जइदत्ताण्णा, व्योग्येशपर्व, अनिलदादा जग्ताप, बाजीराव चौहान, ज्योतीतैयी मेटे अशी सगळी मंडळी बाप्पांच्या प्रतिक्षेत उभी होती. आत गेल्या गेल्या मुषकानं बाप्पांना बाहेर राजकीय मंडळी आल्याची कल्पना दिली. बाप्पांनी लगोलग एकएकाला आत सोडण्याचे फर्मान सोडले.
सर्वात अधी मुषकाने पुकार केली, जईदत्ताण्णा हाजीर हो… तसे जईदत्ताण्णा मुषकाच्या पुढ्यात आले. बाप्पांनी “ब्वॉला आण्णा काय म्हणतं तुमचं राजकारण?” असा प्रश्न केला. “काय सांगू बाप्पा इतकी वर्ष झाली राजकारण करतोय पण इतकं गचाळ राजकारण ह्याच पाच वर्षात बघीतलं. वरचे नेते काय पण अन् कुणासंगपण युत्या आघाड्या करून र्हायीले. त्यामुळे आमच्या सारख्या विचारांच्या लोकांना कुठे जावं हा प्रश्नच पडलाय. मागच्या पाच वर्षापासून मी अपक्षय. पण आता येळ आली हाय की तुतारी हातात घ्यावी म्हण्तोय. पण आमदार असलेला माझा पुतण्या मला नाय म्हण्तोय. तुमीच कायतरी उपाय सुचवा बाप्पा” म्हणत जईदत्तण्णांनी आपले बोलणे थांबवले.
बाप्पा काही बोलणार इतक्यात मुषकच मध्ये बोल्ले, “पण मी काय म्हण्तो आण्णा, जी काय इस्टेट असेल ती द्याकी तीन समान हिस्स्यात वाटून… कशाला पुतण्या तरी तुमची वाट अडविन. सगळे सागर एकत्र आणून पुन्हा गुण्यागोविंदानं नांदाकी… महासागरासारखं… एका घराचे तीन टुकडे झाल्याव लोक कसे घरात घुसत्यात हे बघीतलंय ना तुमी. बीडचे पत्रकार नेहमीच म्हण्तात, ‘क्षीरसागरांच्या घरावरील सत्तेचा सुर्य कधी मावळत नाही’ पण आता ते इतिहासजमा होण्याआधीच घरातील कर्त्या पुरूषाने पुढाकार घेऊन एकोप्यानं इच्चार करा. 60 वर्ष झाले की सरकारी कर्मचारी स्वतःहून रिटायर होतात. पण राजकारण्यांना साठीनंतर खरा च्येव सुटतोय. तरूण पिढीच्या हातात सूत्रं सोपवून तुमी मोकळं व्हावं आण्णा” मुषकाला थांबवत बाप्पा मोजकेच बोल्ले. ‘तीन तिघाडा अन् काम बिघाडा’ झालाय तुमच्या घराचा. त्यामुळं सगळे एका जागेव बसा अन् ठरवा. परळी काय अन् बारामती काय? भायेरचा त्यो भायेरचाच अस्तो हे ध्यानात ठिवा अन् राजकारण करा. बाकी जईदत्ताण्णांना माजलगावचा चॉईसपण काई अवघड नै”.
मुषकाने पुढचा आवाज दिला, व्योगेशभैय्या हाजीर हो… तसे व्योगेशभैय्या अन् सारिकातैयी गुलाबी पेहरावात आत आले. बाप्पांना नमस्कार करून व्योगेशभैय्या बोलायला लाग्ले. “बाप्पा कायबी करा पण आमच्या चुल्त्याला ह्याबारी थांबवा. चुल्ते थांबले की मग आमच्या धन्दीपभैय्यांचा मी खुर्दाच करतो. बारामतीचे दादा आपल्यावर खुश हैत. त्यांनी तिकिट द्यावा, अन् धन्नुभौनं आमच्या मागं ठाम उभं र्हावा येवढाच आशीर्वाद द्या आमाला…
व्योगेशपर्व बोलायचे थांबताच मुषक म्हणाले, “घरचे ते घरचे अस्त्यात. भायेरच्यांचा आशीर्वाद म्हणजे उधारी अस्ते. अस्वलाचा अन् माकडाचा खेळ बघावा तसे लोक तुमच्या घराचा खेळ बघायलेत. तुमच्या घरात झालेला तीन तिघाडा आधी सोडवा, त्याशिवाय राजकारणात तुमच्या घराचं काय खरं नैय. ज्येष्ठांनी तरुणांच्या हातात कारभार द्यायला हवाय पण ज्येष्ठ ऐकत नस्तील तर तरूणांनी योग्य संधीची वाट पहावी”
ज्योतीतैयी हाजीर हो, म्हणत मुषकाने पुढची पुकार केली. ज्योतीतैयीनी बाप्पांना नमस्कार करून सांगायला सुरूवात केली. “आमच्या ह्यांनी समाजासाठी बलीदान दिलंय. त्यामुळं पक्षांच्या दरबारात नाय पण जन्तेंच्या दरबारात मी आता पदर पसरतेय. हे ‘विनायका’ फक्त तुमचा आशीर्वाद सोबत राहू द्या. आमची संग्राम तुटली तरी माझा विश्वास तुटू देवू नका, तुम्ही सोबत राहा, मला अबला नव्हे तर सबला व्हायचंय. बस्स येवढंच मागणं है” बाप्पांनी हसत हसत ज्योतीतैयीला सांगितलं. “ही संधी पुन्हा नाय. आगे बढो…”
मुषकाने पुढची पुकार केली. बाजीरावभैय्या हाजीर हो, बाजीरावभैय्या हसत हसतच बाप्पांच्या चरणी लीन झाले आणि बोलू लागले. “सामान्य घरातल्या पोरांनी कधी आमदार व्हायचं की नाही? शीएम सायेबांच्या आदेशावरून मी रुग्णांची सेवा करतोय. लोक मला आरोग्यदूत म्हणत्यात. आमदार म्हणून निवडून आलो तर 10 हजार कोटीत बीडचा इकासच इकास करून टाकील. मला लोक नवखा म्हणतात, पण बर्याच जणांना खबर नाय की सुरत-गुवाहाटी-मुंबई आमदारांच्या ट्रीपचं नियोजन मी केलंय. सगळ्यांना तिकडं झाडी, डोंगर, हाटील म्या दाखविलंय. सगळ्यांना ‘50 खोके एकदम ओके’ करण्यात माझा वाटा है. आताबी आंतरवालीत अन् शीएम सायेबांमधी काय निरोप अस्सल तर मह्या थ्रो जातो. त्यामुळं ह्या गरीब लेकराला आता तुमच्या आशीर्वादाने एक संधी द्या. तुमचा आशीर्वाद मिळाली की म्होरून कुणीबी येऊद्या, सगळ्यांस्नी खुंदळून काढतो”
मुषकाने पुढची पुकार केली, अनिलदादा हाजीर हो… अनिलदादा हाजीर झाले. त्यांनी बाप्पांना नमस्कार केला. अन् सांगायला लाग्ले. आमची उभी हयात गेली धनुष्यबाणाचं ओझं उचलण्यात. शीएम सायेबांनी मला शब्द दिला तवा मी मशाल फेकून देवून धनुष्यबाण उचलला. खरा सैनिक म्हणून मला संधी मिळायला हवी. ही संधी नाय तर मग पुना कवाच संधी मिळायची नाय बगा. आंतरवालीचा आशीर्वाद मी आण्तो. मला आता तुमच्या आशीर्वादाची गरज हाय.”
आता बर्यापैकी उजाडलं व्हतं. गर्दी होऊ लागली. अनेकांनी गुलाबी जॅकेट घालून एन्ट्री केली होती. त्यात खासकरून संपादक तैय्यबभैई, गवतेबाप्पू, फारूकभैई, अमरनाना, दुसर्या बाजुने तुतारी हातात घेऊन भागवत, सीए बी.बी. जाधव उभे होते. तिसर्या बाजुने शफिकभौचा जत्था आला. त्यांनी नारा दिला, हिंदू मुस्लिम भाईभाई, चौथ्या बाजुने ‘एकच नारा भैय्या हमारा’ म्हणत स्वप्नील भैय्यांचे कार्यकर्ते रेस्ट हाऊसमध्ये दाखल झाले. त्यापाठोपाठ रमेशभौ, किशोर पिंगळे, सुरेश नौले आले. चौघांच्याही हातात आंतरवालीच्या माणसाचा फूटू होता. रेस्टहाऊसच्या पाठीमागून ‘लूट गये हम लूट गये’ हे गाणे वाजवत कुंडलीक खांडे, राजेंद्र मस्केंची एन्ट्री झाली. तितक्यात बीड नगरीचे आमदार धन्दीपभैय्या दाखल झाले. त्यांनी एकाच्या हातातून तुतारी हिस्कावत ‘गणपती बाप्पा मोरया’ची जोरदार घोषणा दिली. त्या घोषणेनंतर सगळी दाणादाण उडाली. गर्दीतील सगळेच एकमेकांना कोपरे हाणीत पुढं पुढं सरकण्याचा प्रयत्न करू लागले. तसं मुषकाने बाप्पांना सांगितलं. “तुतारीवर ज्याचा हक्क होता त्याच्या हातात तुतारी आली बाप्पा”
– बालाजी मारगुडे, बीड
मो.9404350898
मुषकराज पर्व 5 वे भाग 10