बीड : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेने जिल्ह्याला हादरवून सोडले होते. या हत्या प्रकरणातील फरार आरोपींपैकी प्रमुख सुदर्शन घुले व सुधीर सांगळे या दोघांनाही बीडच्या पोलिसांनी शुक्रवारी (दि.३) रात्री पुण्यातून ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा गतीने उलगडा होणार आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे. घुले, सांगळे या दोघांना पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतली असून आता पुढील तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिले जाणार असल्याची माहिती बीडची पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. हत्येची घटना घडली त्यादिवशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीने मयत संतोष देशमुख यांचे लोकेशन दिल्याचा संशय आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.